अग्निशमन दलाच्या ताफ्यात येणार दहा कोटींची गाडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात अत्याधुनिक ब्रांटो स्कयलिफ्ट ही गाडी लवकरच दाखल होणार आहे. शहरातील ३६ मीटर उंचीच्या इमारतींना लागलेली आग आटोक्‍यात आणण्यासाठी महापालिकेकडे यंत्रणाच नव्हती. त्यामुळे दहा कोटी ४८ लाख रुपये किंमत असेलेली ही गाडी खरेदी करण्यासाठी सर्वसाधारण सभेने नुकतीच मंजुरी दिली आहे. 

महापालिकेतर्फे शहरात ३६ मीटर उंचीच्या इमारतींना बांधकाम परवानगी देण्यात येत आहे. टीडीआर वापरामुळे इमारतींच्या उंची दिवसेंदिवस वाढत असल्या तरी या ठिकाणी एखादी दुर्घटना घडल्यास किंवा आग लागल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेकडे यंत्रणाच नव्हती. अग्निशमन विभागाकडे साध्या गाड्या असून मोठ्या इमारतींना आगी लागल्यास कर्मचाऱ्यांना शिड्यांचा वापर करून पाण्याचा मारा करावा लागतो. त्यामुळे लिफ्ट असलेले वाहन खरेदी करण्यासाठी अग्निशमन विभागातर्फे गेल्या सहा वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. 

यंदाच्या अर्थसंकल्पात अत्याधुनिक वाहन खरेदी करण्यासाठी आठ कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले होते. त्यानुसार अग्निशमन विभागाच्या वतीने वाहन खरेदीसाठी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवण्यात आला. या प्रस्तावाला सभेने मंजुरी दिली आहे. शहरात सध्या ३६ मीटर उंचीच्या इमारतीला (सात मजली) बांधकाम परवानगी देण्यात येत असली तरी या वाहनाच्या लिफ्टची क्षमता ४२ मीटरपर्यंतची राहणार आहे. ब्रिजवासी फायर सेफ्टी सिस्टीम या कंपनीने ब्रांटो स्कायलिफ्ट मॉडल या वाहनाचे कोटेशन दिले असून, त्यानुसार किंमत १० कोटी ४८ लाख ७६ हजार एवढी राहणार आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्येसुद्धा या वाहनाचा वापर केला जाणार आहे. 

सध्या असलेली वाहने 
रेस्क्‍यू व्हॅन-  एक
फायर टेंडर- पाच
वॉटर मिस्टमिनी फायर टेंडर - एक
स्कॉरपिओ - एक
बलोरो जीप - एक
इनोव्हा - एक