मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांना १७ हजार कोटींची गरज - प्रा. प्रदीप पुरंदरे

औरंगाबाद - विचार व्‍यक्‍त करताना प्रा. प्रदीप पुरंदरे.
औरंगाबाद - विचार व्‍यक्‍त करताना प्रा. प्रदीप पुरंदरे.

औरंगाबाद - मराठवाड्यातील ५९५ सिंचन प्रकल्प २०३० पर्यंत पूर्ण करण्यासाठी १७ हजार ८०३ कोटी रुपयांची गरज आहे; पण मराठवाड्याच्या जलविकासात गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळच अडथळा निर्माण करीत आहे, अशी टीका जलतज्ज्ञ प्रा. प्रदीप पुरंदरे यांनी शनिवारी (ता. १२) केली. दरम्यान, जल आराखडा चुकीचा असल्याचे कारण देत रिपाइं डेमोक्रॅटिकच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. 

स्वामी रामानंद तीर्थ सोशियो इकॉनॉमिक्‍स रिसर्च अँड नॅशनल इंटिग्रेशन संस्थेतर्फे ‘गोदावरी जलआराखडा आणि मराठवाडा’ या विषयावर प्रा. पुरंदरे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे सचिव शरद अदवंत, कोषाध्यक्ष सुरेश देशपांडे, जल तज्ज्ञ या. रा. जाधव, श्रीराम वरुडकर, प्रतापराव बोराडे, प्रा. एच. एम. देसरडा, डी. आर. शेळके, के. ई. हरदास, सांगर टाकळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे (डेमोक्रॅटिक) सचिन गंगावणे, नगरसेवक रमेश जायभाये, महेश रगडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी येत जल आराखड्याविरोधात घोषणाबाजी केली. 

पाच मिनिटे थांबून ही मंडळी कार्यक्रम स्थळावरून निघून गेली. त्यानंतर प्रा. पुरंदरे यांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले, ‘‘गोदावरी पाटबंधारे मंडळाकडून कालवा सल्लागार समितीच्या बैठका कधीच वेळेवर घेतल्या जात नाहीत. गेल्या वर्षी जायकवाडी धरणात ८० टक्के पाणीसाठा असताना ऑक्‍टोबरमध्येच पाणी सोडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ते डिसेंबरमध्ये सोडण्यात आले’’, असे त्यांनी सांगितले.

आजच्या कार्यक्रमात रिपाइंच्या एक गट आला. त्यांनी घोषाबाजी केली. जल आराखड्याविषयी त्यांचा काही गैरसमज झाला असेल. या कार्यक्रमात आम्ही प्रश्‍न -उत्तरही ठेवले होते. आम्ही त्यांना आवाहन केले की तुमचे म्हणणे यात मांडा. मात्र, ते लोक तेथून निघून गेले.
- प्रा. प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ

चुकीच्या गोदावरी जल आराखड्यामुळे मराठवाड्याचे वाळवंट होणार आहे. मराठवाड्याच्या नुकसानीस तज्ज्ञ समितीचे सदस्य या नात्याने प्रा. प्रदीप पुरंदरे हे जबाबदार आहेत. चुकीचा आराखडा मांडून त्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यात येत आहे. याला विरोध करण्यासाठी आज आमचे कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी गेले आणि त्यांनी हा कार्यक्रम उधळून लागवला. 
- कैलास गायकवाड, रिपाइं डेमोक्रॅटिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com