२१३ ग्रामपंचायतींसाठी ८५ टक्‍के मतदान

बिडकीन - बिडकीन येथील सरस्वती भुवन विद्यालयात शनिवारी भरपावसातदेखील मतदान करताना मतदार.
बिडकीन - बिडकीन येथील सरस्वती भुवन विद्यालयात शनिवारी भरपावसातदेखील मतदान करताना मतदार.

औरंगाबाद - जिल्ह्यातील २१३ ग्रामपंचायतींसाठी शनिवारी (ता. सात) सरासरी ८५ टक्‍क्‍यांपर्यंत मतदान झाले. आगामी निवडणुकीची नांदी असलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीतील मतदानानंतर आता उमेदवारांसह मतदारांना निकालासाठी सोमवारची (ता. नऊ) प्रतीक्षा लागली आहे. तथापि, निवडणुकीपूर्वी मतदान असलेल्या गावांचे वीज भारनियमन रद्द करावे, अशा सूचना करूनही गोलटगाव येथे वीज गायब झाली होती. यामुळे कर्मचाऱ्यांना समस्यांना सामोरे जावे लागले.

यंदा प्रथमच थेट जनतेमधून सरंपच निवडीची प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळेच मतदानाचा टक्‍कादेखील वाढला आहे. जिल्ह्यात २१३ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदासाठी ६१२ उमेदवारांचा समावेश आहे. दुसरीकडे सदस्यपदांसाठी तीन हजार ४२० उमेदवार आहेत. औरंगाबाद तालुक्‍यातील ३४ ग्रामपंचायतींसाठी ११४ केंद्रांवर ८७.५७ टक्के, फुलंब्री तालुक्‍यातील १७ ग्रामपंचायतींसाठी ५७ केंद्रांवर ८८.१३ टक्के, सोयगाव तालुक्‍यातील पाच ग्रामपंचायतींसाठी १६ केंद्रांवर ८३.०५ टक्के, सिल्लोड तालुक्‍यातील १८ ग्रामपंचायतींसाठी ६१ केंद्रांवर ८३.२३ टक्के, खुलताबाद तालुक्‍यातील दहा ग्रामपंचायतींसाठी ३१ केंद्रांवर ८८.३९ टक्के, वैजापूर तालुक्‍यातील २१ ग्रामपंचायतींसाठी ६५ केंद्रांवर ८२.९९ टक्के, गंगापूर तालुक्‍यातील ३५ ग्रामपंचायतींसाठी १०७ केंद्रांवर ८६.५३ टक्के, पैठण तालुक्‍यातील २२ ग्रामपंचायतींसाठी ८१ केंद्रांवर (८७५७) मतदान झाले. कन्नड तालुक्‍यातील ५१ ग्रामपंचायतीसाठी १६० केंद्रांवर सरासरी ८४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

औरंगाबाद तालुक्‍यातील ३४ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ८४० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामगीरी बजावली. तालुक्‍यातील गोलटगाव, लाडसावंगी, गांधेली आणि रहाळपट्टी तांडा या चार ग्रामपंचायतींचे मतदान केंद्र संवेदनशील असल्यामुळे स्वतंत्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, निवडणूक होत असलेल्या गावांतील भारनियमन रद्द करण्यात यावे, अशा सूचना प्रशासनाने महावितरणला केली होती. मात्र, असे असतानाही गोलटगाव येथे शुक्रवारी (ता. सहा) सायंकाळी तसेच पुन्हा शनिवारी (ता. सात) सायंकाळी वीज गायब झाली होती. यामुळे कर्मचाऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे मतदान होत असलेल्या गावांचे भारनियमन रद्द करावे, अशा सूचना करूनही त्याचा फायदा झाला नसल्याची बाब यानिमित्ताने समोर आली आहे. तालुक्‍यातील ११४ मतदान केंद्रांसाठी १२८ कंट्रोल युनिट (सीयू) आणि २१० बॅलेट युनिटची (बीयू) व्यवस्था करण्यात आली होती; तसेच १७ निवडणूक निर्णय अधिकारी, तर प्रत्येक मतदान केंद्रांवर चार ते पाच निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती होती. गटविकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आचारसंहिता पथक नेमण्यात आले होते. या निवडणुकीचा सोमवारी (ता. नऊ) दुपारपर्यंत निकाल हाती येईल. याच वेळी बिनविरोध निवडून आलेले सरपंच, सदस्यांची नावे घोषित केली जातील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com