गणेश महासंघ करणार २५ हजार वृक्षलागवड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

विसर्जनानंतर राबविणार स्वच्छता अभियान

औरंगाबाद - गणेश महासंघातर्फे यंदाही विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छतेसंदर्भात पथनाट्य, लोककलांवर भर दिला जाणार असून यंदा गणेशोत्सवादरम्यान २५ हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारणार असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष राजू शिंदे यांनी दिली. 

विसर्जनानंतर राबविणार स्वच्छता अभियान

औरंगाबाद - गणेश महासंघातर्फे यंदाही विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छतेसंदर्भात पथनाट्य, लोककलांवर भर दिला जाणार असून यंदा गणेशोत्सवादरम्यान २५ हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारणार असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष राजू शिंदे यांनी दिली. 

गणेश महासंघातर्फे आयोजित विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी बुधवारी (ता. २३) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी श्री. शिंदे म्हणाले, की दरवर्षी गणेश महासंघातर्फे विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाही शहरातील गणेश महासंघाचे हे ९३ वे वर्ष असून समर्थनगर येथील सावरकर चौकातील महासंघाच्या कार्यालयात शुक्रवारी (ता. २५) सकाळी दहाला गणेश मूर्तीची स्थापना करून उत्सावाला प्रारंभ होईल. तसेच ४ सप्टेंबरपर्यंत महासंघातर्फे सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि आमदार सतीश चव्हाण हे उपस्थित राहतील. 

महासंघातर्फे यंदा पहिल्यांदाच महालक्ष्मी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून (९७६४६३००००) या व्हॉट्‌सॲप क्रमांकावर सजावटीचे छायाचित्र पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गणपती विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी मिरवणूक मार्गावर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या वेळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, कार्याध्यक्ष तथा नगरसेवक नंदकुमार घोडेले, माजी अध्यक्ष अभिजित देशमुख, संदीप शेळके उपस्थित होते.
 

विसर्जन विहिरीची आज पाहणी
महापालिका आयुक्त व गणेश महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून गुरुवारी (ता. २४) दुपारी गणेश विसर्जन विहिरीच्या स्वच्छतेची पाहणी करण्यात येणार आहे.

२६ ऑगस्ट - सकाळी ११ वाजता भावसिंगपुरा येथील मनपा शाळेत शालेय साहित्य व वह्या वाटप. 
२७ ऑगस्ट - सकाळी साडेदहा ते रात्री साडेनऊ या वेळेत प्रोझोन मॉल येथे ढोल पथक स्पर्धा. 
२८ ऑगस्ट - सकाळी ११ वाजता बेगमपुरा परिसरात वृक्षारोपण. 
२९ ऑगस्ट- सकाळी दहा वाजता छत्रपती महाविद्यालयात तलवारबाजी स्पर्धा. 
३० ऑगस्ट -  महालक्ष्मी सजावट स्पर्धा असून सकाळी दहा ते पाच या वेळेत व्हॉट्‌सॲप क्रमांकावर छायाचित्र पाठवायचे आहे. 
३१ ऑगस्ट - महासंघ व महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध भागांत स्वच्छेतवर जनजागृतीसाठी लोककला आणि पथनाट्यांचे आयोजन.
१, २ सप्टेंबर - एक मिनीट स्पर्धा (खेळ पैठणीचा) शहरातील विविध भागांत दुपारी १२, ३ आणि ५ वाजता 
३ सप्टेंबर - दुपारी २ वाजता जिल्हा परिषद मैदानावर कुस्त्यांची दंगल
४ सप्टेंबर - मयूर पार्क येथे दुपारी १ ते ४ रांगोळी स्पर्धा. 
५ सप्टेंबर - संस्थान गणपती मंदिरापासून सकाळी दहा वाजता विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ. 
६ सप्टेंबर - विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर स्वच्छता अभियान.