महापालिका बांधणार दोन हजार आठशे स्वच्छतागृहे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - शहर पाणंदमुक्त करण्यासाठी येत्या ३० ऑगस्टपर्यंत कोणत्याही स्थितीत स्वच्छतागृह बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करा, अशी ताकीद महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी शनिवारी (ता. १२) अधिकाऱ्यांना दिली. यावेळी आयुक्तांनी स्वच्छतागृह बांधकामाचा कालबद्ध कार्यक्रम निश्‍चित करीत स्वच्छता निरीक्षक, वॉर्ड अधिकाऱ्यांपासून सर्व विभागप्रमुखांना उद्दिष्टपूर्तीसाठी कामाला लागा, असा निर्वाणीचा इशारा दिला.

औरंगाबाद - शहर पाणंदमुक्त करण्यासाठी येत्या ३० ऑगस्टपर्यंत कोणत्याही स्थितीत स्वच्छतागृह बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करा, अशी ताकीद महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी शनिवारी (ता. १२) अधिकाऱ्यांना दिली. यावेळी आयुक्तांनी स्वच्छतागृह बांधकामाचा कालबद्ध कार्यक्रम निश्‍चित करीत स्वच्छता निरीक्षक, वॉर्ड अधिकाऱ्यांपासून सर्व विभागप्रमुखांना उद्दिष्टपूर्तीसाठी कामाला लागा, असा निर्वाणीचा इशारा दिला.

स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत शहर पाणंदमुक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. मात्र, वैयक्तिक स्वच्छतागृह योजना राबविताना प्रशासकीय यंत्रणा हलगर्जीपणा करत असून, त्यामुळेच अद्याप उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही, ही बाब आयुक्तांच्या लक्षात आली. म्हणून ते शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांवर चांगलेच बरसले. बैठकीला स्वच्छता निरीक्षक, वॉर्ड अभियंता यांच्यासह अनेक अधिकारी गैरहजर होते. त्यामुळे आयुक्तांचा पारा चांगलाच चढला. गैरहजर अधिकाऱ्यांच्या वरिष्ठांनाच त्यांनी धारेवर धरले. बैठकीनंतर आयुक्त श्री. मुगळीकर यांनी सांगितले, शहर पाणंदमुक्त करण्याबाबत नुकत्याच शासनाकडून महापालिकेला सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आगामी ३० ऑगस्टपर्यंत शहर पाणंदमुक्तीसाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. प्रशासकीय सुट्या वगळता हा दहा दिवसांचा कार्यक्रम असेल. वॉर्डावॉर्डात जाऊन महापालिकेची यंत्रणा, ज्यांनी आतापर्यंत वैयक्तिक स्वच्छतागृह बांधलेले नाही त्यांना योजनेचा लाभ मिळवून देईल व उघड्यावर जाण्याचा प्रकार थांबविण्यात येईल, असे आयुक्त म्हणाले. शहरात आतापर्यंत ५ हजार तीन वैयक्तिक स्वच्छतागृह बांधण्यात आले आहेत. महापालिकेचे उद्दिष्ट हे ७ हजार आठशे स्वच्छतागृह बांधण्याचे आहे. त्यामुळे तीस ऑगस्टपूर्वी २,७९७ वैयक्तिक स्वच्छतागृह बांधण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे.

उपसचिवांच्या बैठकीलाही दांडी
वैयक्तिक स्वच्छतागृहाच्या बांधकामाचा आढावा घेण्यासाठी गेल्या आठवड्यात उपसचिव सुधाकर बोबडे शहरात आले होते. त्यांच्या बैठकीचा निरोप आयुक्तांनी अधिकाऱ्यांच्या व्हॉटस्‌ॲप ग्रुपवरून दिला होता, मात्र या बैठकीला एकही अधिकारी आला नाही, ही बाबदेखील आयुक्तांना खटकली होती. त्यामुळे आजच्या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 
 
ड्रेनेज नाही, सेफ्टी टॅंक घ्या!
शहर परिसरातील अनेक भागांत ड्रेनेज लाइन पोचलेली नाही. त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांना स्वच्छतागृह बांधताना अडचणी येतात. अशा वसाहतींतील लाभार्थ्यांना स्वच्छतागृहाच्या अनुदानासोबतच सेफ्टी टॅंक देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यासाठी लागणारा निधी सीएसआरमधून उपलब्ध करून दिला जाणार आहे.

दहा दिवस विशेष मोहीम
-धार्मिक स्थळांच्या कारवाईमधून उसंत मिळालेले प्रशासन आता पुढील दहा दिवस शहरात सकाळी पाच ते सायंकाळी पाचपर्यंत स्वच्छतागृहांच्या बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी फिरणार आहे. 
-स्वच्छतागृह बांधकामासाठी डेटॉल कंपनीचे चारजण व काही विद्यार्थी जनजागरण करणार आहेत.  
-वॉर्ड अभियंत्यांच्या सोबतीला दोन स्वच्छता निरीक्षक, तीन कनिष्ठ अभियंते देणार.

Web Title: aurangabad marathwada news 2800 toilet build by municipal