अजूनही ३२२ गावांत स्मशानभूमीचा प्रश्‍न सुटेना

मधुकर कांबळे
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

स्मशानभूमीसाठी २०१२ पासून जिल्हा परिषदेत प्रस्ताव देत आहे; परंतु अद्याप स्मशानभूमी मंजूर झाली नाही. विमला नदीकाठावर अंत्यसंस्कार केले जातात. त्याच्या जवळच गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. मृताच्या नातेवाइकांना मृतदेह खांद्यावर घेऊन राज्य महामार्ग ओलांडून जावे लागते. १९९६ मध्ये रस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेने एक मुलगा मरण पावला होता.  
- शिवाजी गिरधर मोरे, सरपंच, पिंपळगाव पांढरी.

औरंगाबाद - शहरात अंत्यविधीसाठी स्वर्गरथ, मोक्षरथ, वैकुंठरथ असतात; मात्र खेड्यांत असा कोणताही रथ नसतो. गावात मृतदेह खांद्यावर घेऊन कितीतरी अंतर पायपीट करावी लागते. अवघी ११२० लोकसंख्या असलेल्या पिंपळगाव पांढरी गावात अंत्यसंस्कारासाठी मृतदेहाला विमला नदीकाठी नेण्याशिवाय पर्याय नाही. तिरडी खांद्यावर घेत नदीकडे राज्य महामार्ग ओलांडून जावे लागते. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने कधी कधी अपघातही होतात. औरंगाबाद शहरापासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेले हे स्मशानभूमी नसलेले जिल्ह्यातील एक प्रातिनिधिक गाव आहे. जिल्ह्यातील ३२२ गावांमध्ये थोड्याफार फरकाने अशीच स्थिती आहे.

जिल्ह्यातील काही मोठ्या गावांमध्ये प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र स्मशानभूमी आहे; परंतु ३२२ गावांमध्ये प्रत्येक जातीची तर दूरच, एकही स्मशानभूमी नाही. शेतकरी कुटुंबीय आपल्या मृत नातेवाइकांवर शेतात अंत्यसंस्कार करतात; मात्र ज्यांच्याकडे शेतीचा तुकडाच नाही त्यांच्या कुटुंबातील कोणी मरण पावले तर स्मशानभूमी नसल्याने ओढ्याकाठी, नदीकाठी मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. 

स्मशानभूमीचे शेड तयार करण्यासाठी, संरक्षक भिंत बांधण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत लोकसंख्येच्या प्रमाणात तीन ते पाच लाख रुपयांचा निधी गावाला उपलब्ध करून दिला जातो. यासाठी स्मशानभूमीसाठी निर्विवाद जागा उपलब्ध असल्यास ग्रामसभेत ठराव घेऊन पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवला जातो व जिल्हा परिषदेकडून तो जिल्हा नियोजन समितीकडे पाठवला जातो. गेल्या एप्रिलपासून आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे स्मशानभूमीच्या मागणीसाठी २५० गावांनी प्रस्ताव दाखल केले आहेत.

जिल्हा परिषदेनेही जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवले आहेत; मात्र अद्याप स्मशानभूमींना मंजुरी व निधी उपलब्ध होऊ शकला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.