औरंगाबाद जिल्ह्यातील साडेतीनशे गावांत टंचाईचे सावट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - यंदा ऊर्ध्व भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जायकवाडी धरण भरले असले तरी जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण समाधानकारक नाही. यामुळे छोट्या व मध्यम प्रकल्पांतील पाणीपातळी दहा टक्‍क्‍यांच्या पुढे जाऊ शकली नाही. यासोबतच अनेक ठिकाणची पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने आगामी काळात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्‍यता जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केली.

मराठवाड्यातील 11 मोठ्या धरणांपैकी बहुतांश धरणे भरली आहेत. असे असताना जिल्ह्यात मात्र, आजपर्यंत अपेक्षित पाऊस पडलेला नाही. त्यामुळे मध्यम, छोटी धरणे, तलावात म्हणावा तसा पाणीसाठा होऊ शकला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 72 टक्के पर्जन्यमान झाले आहे. यात औरंगाबाद तालुक्‍यात 89, पैठण 62, सिल्लोड 88, फुलंब्री 77, सोयगाव 51, कन्नड 68, वैजापूर 108, गंगापूर 72 आणि खुलताबाद तालुक्‍यात सरासरीच्या तुलनेत 57 टक्के पाऊस पडला आहे. सद्यःस्थितीत औरंगाबाद, फुलंब्री आणि वैजापूर तालुक्‍यातील 30 गावांना 28 टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.