केवळ पाच हजार कोटींची कर्जमाफी - पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरवातीला शेतकरी कर्जमाफीला विरोध केला. शेतकऱ्यांनी तगादा लावल्यानंतर कर्जमाफीस तयार झाले. तेव्हा असलेला 34 हजार कोटी रुपयांचा आकडा, जाचक अटी-शर्तींमुळे आता पाच हजार कोटी रुपयांवर येईल, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त केले.

येथील "एमजीएम' कॅम्पसमध्ये गुरुवारी (ता. पाच) "राजकारणातील नैतिकता' या विषयावरील व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना चव्हाण बोलत होते. भाजप सरकारच्या काळात आत्महत्या होत आहेत, त्याप्रमाणे कॉंग्रेस सरकारच्या काळातही झाल्या. आजही त्या थांबत नाहीत. सरकार असंवेदनशील आहे का? असा प्रश्‍न विचारण्यात आला होता. यावर चव्हाण म्हणाले, 'शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत संख्येचे राजकारण होऊ नये, मात्र तरीही आकडेवारी पाहिली तर हे सरकार असंवेदनशील असल्याचे दिसते. बॅंकेच्या व्याजदरासाठी हे सरकार शेतीमालाच्या किमती दाबून ठेवण्याचे काम मुद्दामहून करीत आहे.''

'भारतातील माध्यमे बहुराष्ट्रीय कंपनीच्या हातात जात आहे. एकाच मालकाच्या हातात सर्व प्रकारची माध्यमे जाणे हे देशासाठी धोकादायक आहे. वर्षभरात त्या मालकांचे वर्चस्व वाढेल,'' अशी भीती चव्हाण यांनी व्यक्‍त केली.

सोसायटीप्रमाणे पक्ष काढतात
निवडणूक निधी आणि पक्षांच्या संख्येवर निवडणूक आयोगाने टाच आणली पाहिजे. मागच्या आठवड्यातच एक पक्ष महाराष्ट्रात सुरू झाला. अनेकांना पक्ष निर्माण करणे म्हणजे को-ऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करण्यासारखे वाटते, असे म्हणत चव्हाण यांनी नारायण राणेंना टोला लगावला. पक्षांची संख्या घटवण्यासाठी देशातील मोठ्या पक्षांनी पुढाकार घेत घटनेत बदल करून घ्यावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.