शहरी भागातून ६० टक्के साप कमी

महेश घोराळे
गुरुवार, 27 जुलै 2017

पावसाळ्यात साप दिसल्यास शहरातून फोन येतात. मानवी वस्तीत आढळणारे ८० टक्के साप हे बिनविषारी असतात; मात्र माणूस भीतीपोटी दिसेल तो साप मारतो. साप विनाकारण चावत नाही, आपल्या बेसावधपणामुळेच सर्पदंश होतो. शहरातील रिकामे प्लॉट किंवा नाल्यांचा भाग लागून असलेल्या परिसरात बिनविषारी साप आढळतात. 
- डॉ. किशोर पाठक, सर्पमित्र

औरंगाबाद - शहरातील दाट वस्ती, कमी होत गेलेला ग्रीन बेल्ट व सापांविषयीचे अज्ञान या प्रमुख कारणांमुळे मराठवाड्यातील शहरी वस्तीतून गेल्या दहा वर्षांत सापांचे सुमारे ६० टक्के प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या साप दिवसेंदिवस धोक्‍यात सापडत आहे.

केवळ नागपंचमीलाच नागाचे मनोभावे पूजन केले जाते. एरवी ‘दिसला की ठेचला’ ही प्रवृत्ती कायम असल्याने सापांविषयी अजूनही गैरसमज आहेत. पावसाळ्यात बाहेर निघून अन्नाच्या शोधात मानवी वस्तीशेजारी हिंडणारे साप हे ८० टक्के बिनविषारी असतात. त्यामध्ये मराठवाड्यात प्रामुख्याने तस्कर, कवळ्या, कुकरी, गवत्या, पाणसाप व धामण हे बिनविषारी साप आढळतात. मात्र, हे बिनविषारी सापही लोकांच्या अज्ञानाचा बळी ठरतात.

शहरात मोकळ्या किंवा अडचणींच्या जागा शिल्लक नाहीत. थोडीफार वाचलेली मैदाने किंवा बगीचांमध्ये विदेशी झाडे असल्याने तेथे पक्षी, फुलपाखरं, सरडे फिरकत नाहीत. पर्यायाने सापही या ठिकाणी थांबत नाहीत.  

मराठवाड्यात आढळणारे साप 
बिनविषारी - मानवी वस्तीशेजारी फिरणारे तस्कर, धामण, गवत्यासह कवळ्या, कुकरी व पाणसाप या बिनविषारी जाती मराठवाड्यात आढळतात. बेडूक, उंदीर, पाली, सरडे, कीटक हे या सापांचे खाद्य आहे. 

विषारी - मराठवाड्यात नाग (कोब्रा), मण्यार, घोणस व फुरसे हे चार विषारी साप आढळतात. सर्पमित्रांच्या मते मानवी वस्तीत आढळणाऱ्या विषारी सापांचे प्रमाण हे वीस टक्‍क्‍यांच्या जवळपास असते.  

सर्पदंश झाल्यास ही काळजी घ्या 
सर्पदंशाच्या दोन इंचवर आवड पट्टी बांधा. त्यामुळे हृदयाकडे विष चढत नाही.  
सर्पदंश झालेल्या व्यक्तीला धीर द्यावा. ती व्यक्ती घाबरल्यास हृदयाचे ठोके वाढतात व शरिरात विष पसरते. त्यामुळे अशा व्यक्तीला शांत बसून ठेवावे. 

अशा व्यक्तीला त्वरित रुग्णालयात दाखल करा व डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार आवश्‍यक औषधोपचार घ्यावा.