आयटीआय प्रवेशाची बुधवारी विशेष फेरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

केंद्रीय प्रवेशप्रक्रिया - रिक्त जागाही भरणार

औरंगाबाद - आयटीआय केंद्रीय प्रवेशप्रक्रियेच्या अद्यापपर्यंत पाचही फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. या फेऱ्यांतून एकूण १ हजार ११० प्रवेश पूर्ण झाले असून उर्वरित जागांसाठी बुधवारी (ता. १३) विशेष समुपदेशन फेरी घेण्यात येणार आहे. 

केंद्रीय प्रवेशप्रक्रिया - रिक्त जागाही भरणार

औरंगाबाद - आयटीआय केंद्रीय प्रवेशप्रक्रियेच्या अद्यापपर्यंत पाचही फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. या फेऱ्यांतून एकूण १ हजार ११० प्रवेश पूर्ण झाले असून उर्वरित जागांसाठी बुधवारी (ता. १३) विशेष समुपदेशन फेरी घेण्यात येणार आहे. 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) प्रवेशप्रक्रिया १९ जूनपासून सुरू झाली. औरंगाबाद आयटीआयमध्ये २८ ट्रेड्‌ससाठी एकूण प्रवेश क्षमता १ हजार १२६ इतकी होती. पाच फेऱ्यांमध्ये अर्थात केंद्रीय प्रवेशाच्या चार फेऱ्या व स्पॉट ॲडमिशनची एक फेरी यात १ हजार ११० प्रवेश झाले असून शुक्रवारी (ता. १) शैक्षणिक वर्षास सुरवात झाली. मात्र, प्रशिक्षण महासंचालनालय, नवी दिल्ली यांनी प्रवेशप्रक्रियेला दिलेल्या मुदतवाढीमुळे नियमित प्रवेश फेऱ्यांनंतर शासकीय आयटीआय संस्थेत रिक्त राहिलेल्या जागांसाठी बुधवारी विशेष समुपदेशन फेरी घेण्यात येणार आहे, अशी माहिती आयटीआयचे उपप्राचार्य एस. वाय. शेख यांनी दिली. 

प्रवेशोच्छुक व नोंदणीकृत उमेदवारांना संबंधित आयटीआय संस्थेत प्रत्यक्ष हजर राहून त्याच दिवशी प्रवेश निश्‍चित करावे लागणार आहेत. आयटीआय संस्थेनिहाय रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही आयटीआयतर्फे कळविण्यात आले. खासगी आयटीआय संस्थेत रिक्त जागांसाठी संस्थास्तरावर प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यातून १३ सप्टेंबर सायंकाळी पाचपर्यंत प्रवेश घेता येणार आहेत.

हे उमेदवार अपात्र असणार 
अद्यापपर्यंत पार पडलेल्या प्रवेश फेऱ्यांमध्ये अनिवार्य प्राधान्यक्रमानुसार जागा मिळूनही प्रवेश न घेतलेले, प्रवेश रद्द केलेले; तसेच पूर्वीच्या समुपदेशन फेरीत जागा मिळूनही प्रवेश न घेतलेले उमेदवार या फेरीसाठी अपात्र आहेत.

असे असेल वेळापत्रक 
१२ सप्टेंबरपर्यंत नव्याने ऑनलाइन अर्ज करणे व प्रवेश अर्ज निश्‍चिती करणे.
१३ सप्टेंबर - आयटीआय संस्थेत रिक्त राहिलेल्या जागांसाठी विशेष समुपेदशन फेरी सकाळी ११ वाजेपासून सुरू