एमआयडीसी लावणार ८० हजार झाडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

११ हजार खड्डे खोदले, औद्योगिक संघटनांचीही साथ 
औरंगाबाद - ‘एमआयडीसी’ने औद्योगिक क्षेत्रामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने यावर्षी ८० हजार वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. जागांची निवड करीत ११ हजार खड्डे खोदण्यात आले असून, लोकसहभागातून हे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. 

जागतिक तापमानात होणारी वाढ, बदलत चालले ऋतुचक्र यामुळे शासनाने मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड मोहीम हाती घेतली आहे. राज्यातील हरितपट्ट्यात वाढ व्हावी, या हेतूने शासनाने विविध विभागांना वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास (एमआयडीसी) यंदा ८० हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 

गतवर्षी २० हजारांचे उद्दिष्ट एमआयडीसीला देण्यात आले होते. विविध स्वयंसेवी संस्था, खासगी संस्था, उद्योजकीय संघटना, आस्थापना; तसेच लोकसहभागातून एमआयडीसीने ५० हजारांवर झाडे लावली होती. फक्त झाडे न लावता ती वाढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. कंपन्यांनी झाडांना प्लास्टिक, लोखंडी जाळ्या पुरविल्या होत्या. यंदा ८० हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट महामंडळास देण्यात आले आहे. त्या दृष्टिकोनातून वाळूज, पैठण, शेंद्रा, चिकलठाणा, जालना येथील औद्योगिक वसाहतीतील जागांचा शोध घेण्यात आला आहे जिथे मोकळी जमीन आहे, तिथे लागवडीसाठी खड्डे तयार करण्यात येत आहेत. 

वृक्षलागवड उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आस्थापना, खासगी संस्था, स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येत आहे. ‘मसिआ’, ‘सीएमआयए’ या संघटनांच्या मदतीने तयारी सुरू आहे. सद्यःस्थितीत वृक्षलागवडीसाठी ११ हजार खड्डे खोदण्यात आले आहेत. पर्किन्स, वोखार्ड, यांसारख्या नामांकित कंपन्यांचेही सहकार्य लाभत आहे. 
- सोहम वायाळ (एमआयडीसी, प्रादेशिक अधिकारी)