‘आधार’ची दुरुस्ती झाली ‘निराधार’

‘आधार’ची  दुरुस्ती झाली ‘निराधार’

औरंगाबाद - देशातील प्रत्येकाकडे आधारकार्ड असायलाच हवे, अशी सक्‍ती केली जात आहे; मात्र नवीन आधार काढणे आणि असलेल्या कार्डमधील झालेल्या चुका दुरुस्तीसाठी केंद्र शोधण्याची वेळ सामान्य जनतेवर येऊन ठेपली आहे. यामुळे सक्‍ती केली जात असतानाच प्रशासनाची अनास्थाही समोर आली आहे.

मतदान कार्ड, पॅनकार्ड नंतर आता सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे ते आधारकार्डला. राज्य, केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासह आणि दैनंदिन कामासाठीही आधारकार्डची सक्‍ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता नवजात मुलाचेही आधारकार्ड बनविण्याची सोय झाली आहे; मात्र काही दिवसांपासून नवीन आधारकार्ड काढण्यासाठी तसेच काढलेल्या कार्डातील दुरुस्तीसाठी आधार केंद्राची शोधाशोध करावी लागत आहे. विशेष म्हणजे प्रशासनाला याचे काहीही सोयरसूतक नसल्याचे चित्र आहे. तसेच आधारकार्डसाठी कुठेलेही शुल्क लागत नाहीत. हे बहुतांश नागरिकांना माहीतच नाही. त्यात प्रशासनाचा रामभरोसे असलेल्या कारभारामुळे नागरिकांची सर्रास लूट होत आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष नसल्यामुळे मोफत मिळणाऱ्या आधार कार्डसाठी जनतेची लूट होत आहे. त्यामुळे याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे. 

खासगी सेवा बंद 
आधारकार्ड काढून देणारे खासगी सेवा केंद्र शासनाने बंद केले आहे. दरम्यान, त्याला पर्यायी असलेले इतर केंद्र कुठे आहे, याची काहीही माहिती नागरिकांना नाही. दरम्यान, ज्या ठिकाणी सध्या आधारकार्ड काढून दिले जाते त्या ठिकाणी मोफत असलेल्या आधारकार्डसाठी शंभर ते दोनशे रुपयांची आकारणी केली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे जिल्हा प्रशासनाचेही याकडे लक्ष नाही. मनमानी शुल्क आकारणाऱ्या केंद्र चालकांविरोधात ठोस कारवाई आतापर्यंत करण्यात आलेली नाही. त्यामुळे जनतेच्या या लुटीला प्रशासनाची अनास्थाच कारणीभूत ठरत आहे. काही दिवसांपासून बीएसएनएल व डाक कार्यालयात बोटावर मोजण्याइतक्‍याच व्यक्‍तींना आधार दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिली. तेथेही अनेकदा सर्व्हर डाऊन असल्याचे सांगितले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com