आठदा नोंदणी; दोनदा पाठपुरावा तरीही मिळेना आधारकार्ड

आठदा नोंदणी; दोनदा पाठपुरावा तरीही मिळेना आधारकार्ड

वाळूज - आधारकार्ड मिळावे, यासाठी २०११ पासून एकदा, दोनदा नव्हे; तर तब्बल आठ वेळा नोंदणी केली. एवढेच नाही तर सरकारी दप्तरी दोन वेळा पाठपुरावाही केला; पण अद्यापही आधारकार्ड मिळाले नाही. त्यामुळे सोलेगाव (ता. गंगापूर) येथील एका ६४ वर्षीय शेतकऱ्यावर सरकारी योजनेच्या लाभांसह पीक कर्जमाफीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. 

पीक कर्जमाफीसाठी ऑनलाइन फार्म भरताना शेतकरी व त्याच्या पत्नीचा आधार क्रमांकही देणे सक्‍तीचे आहे; परंतु केवळ आधारकार्ड नसल्याने सोलेगाव येथील रामभाऊ सुखदेव पवार (६४) यांना कर्जमाफीचा अर्ज भरता आला नाही. त्यामुळे त्यांच्यावर कर्जमाफीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. पवार यांनी आधारकार्ड काढण्यासाठी प्रथम वर्ष २०११ मध्ये नोंदणी केली होती.

त्यानंतर दोन वर्षे वाट पाहिली; मात्र त्यांचे आधारकार्ड आलेच नाही. त्यानंतर त्यांनी ऑगस्ट २०१३, फेब्रुवारी २०१५, ऑगस्ट २०१५, ऑक्‍टोबर २०१५, सप्टेंबर २०१६, एप्रिल २०१७ आणि जून २०१७ मध्ये आधारसाठी नोंदणी केली आहे.

ज्या-ज्या नोंदणी केंद्रांवर त्यांनी नोंदणी केली. त्या-त्या केंद्रचालकाने पवार यांना आधारकार्ड नोंदणीची पावतीही दिली आहे; परंतु त्यांना आधारकार्ड काही मिळालेच नाही. त्यामुळे पवार हे सर्वच शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित आहेत. दरम्यान, कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी पवार हे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी गेले; मात्र तेथेही त्यांना आधार कार्ड विचारण्यात आले. आधार क्रमांक असल्याशिवाय अर्ज भरता येत नसल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे.

असा केला पाठपुरावा
पवार यांनी १ सप्टेंबर, २०१७ ला जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेत त्यांना समस्या सांगितली. त्यानंतर ८ सप्टेंबर २०१७ ला उपजिल्हाधिकारी( निवडणूक) यांनी मुंबई येथील जनरल विभागीय कार्यालयाचे सहायक संचालकांना पत्र देऊन मार्गदर्शन मागितले. त्यावर यूआयडीएआयचे विभागीय अधिकारी रवींद्र धामणीकर यांनी ३ ऑक्‍टोबर २०१७ ला पवार आणि जिल्हाधिकारी यांना त्याचे उत्तर देत हा आक्षेप टेक्‍नॉलॉजी टीमकडे पडताळणी व कार्यवाहीसाठी पाठविल्याचे सांगितले; मात्र हे पत्र येऊन दोन महिने झाले. तरीही पवार यांना अजून आधारकार्ड मिळाले. दरम्यान, पीक कर्जमाफीपासून वंचित राहण्याची वेळ पवार यांच्यावर आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com