अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विभागीय आयुक्तालयावर मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी मराठवाड्यातील अंगणवाडी सेविका ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर आहेत. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी युनियनतर्फे बुधवारी (ता. २०) विभागीय आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली. 

औरंगाबाद - अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी मराठवाड्यातील अंगणवाडी सेविका ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर आहेत. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी युनियनतर्फे बुधवारी (ता. २०) विभागीय आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली. 

संघटनेच्या राज्य सचिव ॲड. माधुरी क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पैठणगेट येथून या मोर्चाला सुरवात झाली. गुलमंडी, सिटी चौक ते शहरागंज, गांधी पुतळा मार्गे हा मोर्चा विभागीय आयुक्तालयावर धडकला. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविका या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणला होता. हा मोर्चा विभागीय आयुक्तालयासमोर आल्यानंतर नुकताच खून करण्यात आलेल्या पत्रकार गौरी लंकेश आणि मरण पावलेल्या अंगणवाडी सेविका सखीया बेगम यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर विभागीाय आयुक्तांना निवेदन देण्यात आले. 

या निवेदनात म्हटले, की अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका, महिला व बाल विकास खात्यांशी निगडीत शासनाच्या विविध योजना यशस्वीरीत्या राबवतात. मात्र, त्या बदल्यात त्यांना दिले जाणारे मानधन तुटपुंजे आहे. त्यामुळे त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतनश्रेणीबरोबरच इतर लाभ देण्यात यावेत, अंगणवाडी सेविकांना दिले जाणारे मानधन, प्रवासभत्ता आणि बैठक भत्ता वेळेवर देण्यात यावा, सेवामुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना समाप्ती लाभ देण्यात यावेत, यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे. या निवदेनावर प्रा. राम बाहेती, ॲड. अभय टाकसाळ, तारा बनसोडे, देविदास जिगे, अनिल जावळे, शालिनी पगारे, ताहेरा बेगम, रशीद पठाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोर्चेकऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना रस्ता
मोर्चे, आंदोलने म्हटले की आक्रमकता आलीच. अशावेळी प्रशासनाचे कुणी ऐकून घेण्याच्या मनःस्थितीतही नसते. मात्र, बुधवारी हा मोर्चा विभागीय आयुक्‍तालयावर पोचला असतानाच बैठकीसाठी निघालेले जिल्हाधिकारी नवल किशोर राम यात अडकले. आपल्याला गर्दीतून रस्ता काढणे अवघड जाईल, शिवाय आंदोलक जाऊ देतील की नाही, असा प्रश्‍न निर्माण झाल्याने त्यांनी प्रा. बाहेती यांना बोलावत मला बैठकीसाठी जायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर श्री. बाहेती यांनी गर्दीतून वाट करून दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसोबतच अन्य अधिकाऱ्यांना बैठकीसाठी जाता आले.

जिल्हा परिषदेसमोर केला थाळीनाद
जिल्हा परिषदेसमोर बुधवारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने थाळीनाद आंदोलन केले. या वेळी कार्याध्यक्षा मंगला सराफ, आशा परदेशी, राजू लोखंडे, मंदाकिनी तांबे, रत्नमाला गंफळे, सुनीता मोरे, निर्मला गळबोटे, शोभा बोरसे, मंगला हरिदास, जगदीश चौकीदार, श्रीमती दंडारे, ज्योती भालेराव यांच्यासह जिल्हाभरातून मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनिसांची उपस्थिती होती.