औरंगाबादच्या भेंडीला दुबईत तडका

प्रकाश बनकर
सोमवार, 31 जुलै 2017

कन्नड, वैजापूरमधून महिन्याकाठी 35 टन निर्यात; विदेशांत मागणी वाढली

कन्नड, वैजापूरमधून महिन्याकाठी 35 टन निर्यात; विदेशांत मागणी वाढली
औरंगाबाद - बाजारपेठेतील मागणी आणि हवामानाचा अंदाज घेऊन नियोजनबद्ध शेती केली, तर शेती व्यवसायही फायद्याचा ठरू शकतो, याचा कृतिशील परिपाठ औरंगाबाद, कन्नड आणि वैजापूर तालुक्‍यांतील काही शेतकऱ्यांनी घातला. त्यांनी उत्पादित केलेल्या भेंडीपैकी महिन्याकाठी तब्बल 35 टन भेंडीची दुबईला निर्यात होते. याशिवाय औरंगाबादच्या मिरचीलाही दुबईत मोठी मागणी आहे.

या तीन तालुक्‍यांत मोठ्या प्रमाणात भेंडीचे उत्पन्न घेतले जाते. तिची विदेशांत मागणी वाढली आहे. मुंबईतील भाजी मार्केटच्या माध्यमातून ती विदेशात पाठविली जात आहे. तिच्या जोडीला मिरचीही आहे. सध्या औरंगाबाद जिल्ह्यातून रोज एक ते दीड टन भेंडी दुबईला पाठविण्यात येते. त्या ठिकाणी तिला साडेतीन ते चार हजार रुपये क्‍विंटलप्रमाणे भाव मिळत आहे; तर किरकोळमध्ये 40 ते 50 रुपये किलोने विक्री केली जात आहे. वाशी मार्केटमधील काही व्यापारी आणि बाजार समिती शेतकऱ्यांकडून भेंडी खरेदी करून ती दुबईला पाठवत आहेत. तसेच, मराठवाड्यातील डाळिंब, टोमॅटो, हिरवे कारले यांचीही विदेशात निर्यात होते.

युरोपला कारले "कडूच'
पूर्वी मराठवाड्यातून युरोपमध्ये हिरव्या कारल्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होत होती. मात्र, मध्यंतरी युरोप सरकारने "हायब्रीड' कारणाने त्यावर बंदी आणली होती. परिणामी, निर्यात बंद झाली होती. दरम्यान, वर्ष 2014 मध्ये काही निकष लावून ही बंदी उठवण्यात आली. पण, हे निकष कडक असल्याने मराठवाड्यातून युरोपला कारल्याची होणारी निर्यात कमालीची घटली आहे.

कविटखेडाची 150 टन भेंडी लंडनला
कविटखेडा (ता. कन्नड) येथे गतवर्षी 40 एकरांत 150 टन भेंडीचे पीक घेण्यात आले. ही भेंडी याच गावातून मुंबईच्या निसर्ग फ्रेश कंपनीच्या माध्यमातून थेट लंडनला निर्यात करण्यात आली होती. यंदाही या गावात शेतकऱ्यांनी भेंडीची लागवड केली असून, ती भेंडी दुबईला पोचविली जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात भेंडीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते, तिला विदेशांत मोठी मागणी आहे. फळे आणि पालेभाज्यांना हमखास खरेदीदार मिळतो. आम्ही शाश्‍वत मार्केट तयार करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याचाच भाग म्हणून औरंगाबादची भेंडी, मिरची वाशी मार्केटमधून दुबईला पाठवली जात आहे.
- पंकज गायकवाड, निर्यातदार तथा संचालक, निसर्ग फ्रेश कंपनी, मुंबई