बॅंकेचे काउंटर पोलिस ठाण्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

पाथरीत गोंधळ नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांनी घेतला निर्णय

पाथरीत गोंधळ नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांनी घेतला निर्णय
औरंगाबाद/नांदेड - पीकविमा भरण्यासाठी रविवारीही (ता. 30) शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. मराठवाड्यात ठिकठिकाणी सकाळपासूनच बॅंकांसमोर गर्दी झाली होती. परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शाखेत गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी चक्क पोलिस ठाण्यातच पीकविमा भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.

पाथरीच्या जिल्हा बॅंकेत पीकविमा भरण्यासाठी रविवारी सकाळीच गर्दी उसळली. शनिवारी भरलेल्या फॉर्मची रक्कम भरणे बाकी होते. रविवारी नवीन फॉर्म भरून घ्या म्हणून शेतकरी रेटारेटी करत होते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर शनिवार व रविवार असे कामाचे विभाजन करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक अजयकुमार पांडे यांनी तोडगा काढत शनिवारी रांगेत असलेले पाचशे शेतकरी आणि बॅंकेचे कॅशिअर यांना पोलिस ठाण्यात बोलावून तिथेच काउंटर सुरू केले. यामुळे रविवारी ठाण्यात रांगा लावून काम सुरू होते.

शेतकऱ्याला अर्धांगवायूचा झटका
बीड - गेवराई तालुक्‍यातील माटेगाव (जि. बीड) येथील शेतकरी शंकर रावजी इगवे (वय 60) हे रविवारी सायंकाळी पीकविमा भरण्यासाठी रांगेत उभे असताना चक्कर आल्याने खाली कोसळले. या वेळी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. शेवगाव येथील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. उमापूरच्या जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसमोर पहाटे पाचपासून ते रांगेत होते. गेवराई तालुक्‍यातील पाडळशिंगी येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेत अधिकारी पीकविमा अर्ज स्वीकारत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. सोमवारी (ता. 31) ही पीकविमा भरण्याची अंतिम मुदत असल्याने मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

बॅंकेच्या दारात शेतकऱ्यांचा मुक्काम
उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातही रविवारी सकाळपासून बॅंकांसमोर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या. ग्रामीण भागातून आलेले शेतकरी रात्रभर बॅंकेच्या दारात मुक्कामाला थांबल्याचे चित्र होते. कागदपत्रांची पूर्तता करताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.