सेंट्रल लिक्विड ऑक्‍सिजन सिस्टीमची घाटीला गरज

सेंट्रल लिक्विड ऑक्‍सिजन सिस्टीमची घाटीला गरज

औरंगाबाद - घाटी रुग्णालयाच्या सर्जिकल इमारतीमध्ये शनिवारी (ता. नऊ) ऑक्‍सिजन सिलिंडर बदलताना आवाज झाला आणि स्फोटाच्या अफवेने एकच गोंधळ उडाला. यापूर्वी अनेक घटना घडल्याने यातून धडा घेत घाटी प्रशासनाने सर्जिकल इमारतीतील सेंट्रल लिक्विड ऑक्‍सिजन सिस्टीमचा प्रस्ताव तयार केला; मात्र यावर्षी नवीन प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे वैद्यकीय शिक्षण सचिव संजय देशमुख यांनी स्पष्ट केल्याने त्यालाही २०१८ ची वाट पाहावी लागणार आहे. 

घाटीच्या सर्जिकल इमारतीला ७ डिसेंबरला जवळपास १५ वर्षांनंतर वैद्यकीय शिक्षण सचिव देशमुख यांनी भेट दिली. भेटीमुळे घाटीचे प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली; मात्र त्यांनी नवीन प्रकल्प हाती घेण्याऐवजी सध्या सुरू असलेले प्रकल्प मार्गी लावण्यावर भर असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सर्जिकल इमारतीतील लिक्विड ऑक्‍सिजन सिस्टीमच्या प्रस्तावासह अनेक प्रस्ताव आता २०१८ मध्येच मार्गी लागणार असल्याचे स्पष्ट केले.

दोन वर्षांपूर्वी सर्जिकल इमारतीमधील ऑक्‍सिजन रूममध्ये सिलिंडरला जोडण्यात येणारा पाईप फुटल्याने गोंधळ झाला होता. ऑक्‍टोबरमध्ये ट्रॉमा केअर वॉर्डच्या सेंट्रलाइज ऑक्‍सिजन सिस्टीममध्ये तब्बल आठ दिवस ऑक्‍सिजन गळती झाली. घाटीत अत्याधुनिक ऑक्‍सिजन यंत्रणा (सेंट्रल ऑक्‍सिजन) बसविण्यात आली आहे; परंतु ही यंत्रणा अवघ्या काही वॉर्डांपुरती मर्यादित आहे. अनेक वॉर्डांत रुग्णास ऑक्‍सिजनची आवश्‍यकता भासल्यावर धावपळ करून ऑक्‍सिजन सिलिंडर लावला जातो. लिक्विड ऑक्‍सिजन सिस्टीम बसविण्यासाठी प्रशासनाने तयारी केली. त्यामुळे सिलिंडरद्वारे ऑक्‍सिजन पुरवताना निर्माण होणारे धोके लवकरच कायमस्वरूपी संपुष्टात येईल, अशी अपेक्षा व्यक्त झाली. 

रुग्णालयात दर महिन्याला ऑक्‍सिजनवर सुमारे ६ लाखांवर खर्च होतो. यामध्ये लहान मोठे सिलिंडर आणि लिक्विड ऑक्‍सिजनच्या माध्यमातून वॉर्डांत ऑक्‍सिजनचा पुरवठा करण्यात येतो. सिलिंडर उचलून नेणे, त्याच्यावर लक्ष ठेवणे आणि संपल्यावर बदलण्यासाठी मोठा ताण सहन करावा लागतो. त्यात कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अनेकदा आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवते. त्या वेळी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. या समस्येतून मुक्ततेसाठी सेंट्रल लिक्विड ऑक्‍सिजन सिस्टीम बसवावी, असे वेळोवेळी तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यावर मंत्रालयीन स्तरावर काय निर्णय होतो याकडे घाटीतील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com