औरंगाबाद शहराला पर्यटन, औद्योगिक केंद्र म्हणून विकसित करणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

‘एनएमएससीई’चा पुढाकार, लासूर येथे उभारणार आयटी केंद्र व शीतगृह सुविधा

औरंगाबाद - समृद्धी महामार्गाला नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्‍स्प्रेस वे (एनएमएससीई) असे नाव देण्यात आले असून, या माध्यमातून औरंगाबाद शहराला पर्यटन आणि औद्योगिक केंद्र म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

७०६ कि.मी. लांबीचा हा नियोजित महामार्ग राज्याच्या पूर्व आणि पश्‍चिम भागांना जोडणारा असेल. नागपूर ते मुंबई प्रवासाला सध्या १६ तास लागतात. समृद्धी महामार्गामुळे तो अवघ्या आठ तासांचा होईल. या महामार्गाच्या माध्यमातून परिसरातील पर्यटन केंद्राव्यतिरिक्त, जालना येथे पोलाद उद्योग केंद्र आणि करमाड येथे लॉजिस्टिक केंद्र उभारण्याचीसुद्धा योजना आहे. विजापूर येथे कृषी आधारित कापूस निर्मिती केंद्र आणि जलप्रक्रिया सुविधा उभारण्यात येणार आहेत; तसेच लासूर येथे आयटी केंद्र आणि निवासी सुविधा; तसेच कृषी केंद्र आणि शीतगृह सुविधा विकसित करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

एक नवा औद्योगिक पट्टा
औरंगाबादमधील प्रमुख औद्योगिक क्षेत्रांत चिखलठाणा एमआयडीसी, शेंद्रा एमआयडीसी आणि वाळूज एमआयडीसीचा समावेश आहे. आता येथे शेंद्रा-बिडकीन इंडस्ट्रीयल पार्क नावाचा एक नवा औद्योगिक पट्टादेखील विकसित करण्यात येत आहे. समृद्धी महामार्गामुळे येथील औद्योगिक क्षेत्राला दळणवळणाची मोठी सोय उपलब्ध होणार आहे.