गुढीपाडव्यापासून बाटलीबंद पाणी बंद करू - रामदास कदम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - निसर्गाचा समतोल राखण्यासाठी येत्या पाच महिन्यांत म्हणजे गुढीपाडव्यापासून राज्यात प्लॅस्टिकबंदी करण्यात येणार आहे. सध्या तज्ज्ञांची मते जाणून घेतली जात आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल. असा इशारा पर्यावरण तथा पालकमंत्री रामदास कदम यांनी येथे दिला. तसेच मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीपर्यंत बाटलीबंद पाणीही बंद केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात गुरुवारी प्लॅस्टिक बंदीबाबत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या वेळी मंत्री श्री. कदम यांनी अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत पर्यावरणासंबधी असलेल्या नियमांच्या पालनाबद्दल सूचना केल्या. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत कदम म्हणाले, की पाणी बॉटल तयार करणाऱ्या कंपन्यांना रिकाम्या बॉटल रिसायकलिंग करण्याचा कारखाना सुरू करावाच लागेल. पाण्याच्या रिकाम्या बॉटल धार्मिक स्थळे, नद्या, नाले, मंदिर, शाळा, महाविद्यालये, रस्त्यावर अशा अनेक ठिकाणी पडलेल्या दिसून येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. मुंबईतील काही सीलबंद पाणीबॉटल उत्पादकांनी बॉटल बंदच्या विरोधात वक्‍तव्य केल्याचा मुद्दा त्यांच्यासमोर उपस्थित केला असता, हा देशहिताचा, पर्यावरण समतोल राखण्यासाठीचा निर्णय असून, कुणाचीही मुजोरी खपवून घेणार नसल्याचा दम त्यांनी दिला.

Web Title: aurangabad marathwada news Close the bottled water