विघ्नहर्त्याच्या साक्षीने खैरे-दानवे यांच्यात बाचाबाची

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यात मंगळवारी (ता. सात) चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली. तीदेखील विघ्नहर्त्या गणरायाच्या साक्षीने. गटप्रमुखांची यादी देण्याचे निमित्त घडले आणि त्यातून हा प्रकार घडला. शिवसेनेतील गटबाजी यानिमित्ताने पुन्हा शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीसमोर चव्हाट्यावर आली.

औरंगाबाद - शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यात मंगळवारी (ता. सात) चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली. तीदेखील विघ्नहर्त्या गणरायाच्या साक्षीने. गटप्रमुखांची यादी देण्याचे निमित्त घडले आणि त्यातून हा प्रकार घडला. शिवसेनेतील गटबाजी यानिमित्ताने पुन्हा शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीसमोर चव्हाट्यावर आली.

अंगारिका चतुर्थीनिमित्त मंगळवारी (ता. सात) उपनेते खासदार श्री. खैरे दर्शनासाठी राजाबाजार येथील संस्थान गणपती येथे गेले होते. त्या वेळी त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, माजी नगरसेवक किशोर नागरे, गिरजाराम हाळनोर, सुहास दाशरथे आदींसह अन्य पदाधिकारीही होते. याच वेळी त्या ठिकाणी दर्शनासाठी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे हेसुद्धा आले होते.

दानवे यांनी गटप्रमुखांची यादी खासदारांना दिली. ती यादी घेऊन श्री. खैरे यांनी गणपतीचे दर्शन घेतले. यानंतर फोटो काढण्यासाठी श्री. दानवे यांनी पुन्हा त्यांच्याकडून यादी मागितली, तेव्हा श्री. खैरे यांनी ‘आधीच उशीर केला अन्‌ पुन्हा यादी कशाला पाहिजे’ अशी विचारणा केली. यादीतील नावे पाहून काय चाललेय तुमचे, असा सवालही त्यांनी श्री. दानवे यांना केला. 

तेव्हा श्री. दानवे यांनी ‘कामे आम्ही करायची आणि बोलणीही आम्हीच खायचे का’ असा प्रतिसवाल केला. शब्दाने शब्द वाढतच गेला. त्यानंतर श्री. खैरे यांनी गाडीमध्ये बसणे पसंत केले. श्री. दानवे यांनी त्यांच्या कारचा दरवाजा उघडून ‘तुम्ही इतर कार्यकर्त्यांना मला मारण्याचे सांगता, आता मीच तुमच्यासमोर उभा आहे, मला मारायचे तर मारा,’ असा पवित्रा घेतला. दानवे यांच्या या पवित्र्यामुळे उपस्थित सर्वजण आचंबित होऊन पाहत राहिले.

याचदरम्यान श्री. खैरे जिल्हाप्रमुखांच्या अंगावर धावून गेल्याची चर्चा होती. या वेळी इतर पदाधिकाऱ्यांनी श्री. दानवे यांना बाजूला केले. यानंतर खासदार तेथून निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. शिवसेनेत पुन्हा उफाळलेल्या गटबाजीची चर्चा दिवसभर शहरभर सुरू होती.

मागील चार महिन्यांपासून मी जिल्हाप्रमुखांकडे गटप्रमुखांची यादी मागतोय. मात्र, टाळाटाळ करण्यात येते. भाजपमध्ये ‘एक बूथ टेन युथ’ सुरू करण्यात आलेले आहे. त्यांची लोकसभेची तयारी सुरू झालेली आहे. यादी देण्यास विलंब केला म्हणूनच आजचा वाद झाला. शिवसेनेत वाद होतात आणि मिटतातही. वाद होणे म्हणजे संघटना जिवंत असल्याचे लक्षण आहे. मी मोठा नेता आहे. मी बोलणार, रागावणार; परंतु मला कोणी प्रत्युत्तर देऊ नये. देण्याचा प्रयत्नही करू नये.
- चंद्रकांत खैरे, शिवसेना खासदार

शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे हे आमचे मोठे नेते आहेत. आमच्यामध्ये आज असा कोणताही प्रकार घडलेला नाही.  
- अंबादास दानवे, शिवसेना जिल्हाप्रमुख