‘वंदे मातरम्‌’वरून राडा

औरंगाबाद - माजी उपमहापौर प्रमोद राठोड व एमआयएम नगरसेवकांमध्ये अशी खडाजंगी झाली.
औरंगाबाद - माजी उपमहापौर प्रमोद राठोड व एमआयएम नगरसेवकांमध्ये अशी खडाजंगी झाली.

औरंगाबाद - ‘वंदे मातरम्‌’वरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (ता. १९) जोरदार राडा झाला. वंदे मातरम्‌ सुरू असताना जागेवर बसून राहणाऱ्या एमआयएम, काँग्रेसच्या प्रत्येकी एका नगरसेवकाचे महापौर भगवान घडामोडे यांनी दिवसभरासाठी सदस्यत्व निलंबित केले. त्यानंतर महापौरांच्या निर्णयाचे स्वागत करत शिवसेना-भाजप युतीचे तर विरोधात एमआयएमचे नगरसेवक भिडले. 

‘इस देश में रहेना है, तो वंदे मातरम्‌ कहना है!’ पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्थान झिंदाबाद, या महापौरांचे करायचे काय...., अशा जोरदार घोषणांनी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी सभागृह दणाणून सोडले. त्यात माजी उपमहापौर प्रमोद राठोड व जफर बिल्डर यांच्यात खडाजंगी झाल्याने नगरसेवक हातघाईवर उतरले. एकमेकांना धक्काबुक्की करण्यात आली, रेटारेटी झाली. सभागृहातील माईक तोडण्यात आले. शेवटी हस्तक्षेप करत पोलिस सभागृहात घुसले व नगरसेवकांना सभागृहाबाहेर काढण्यात आले.

दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी महापालिकेत हजेरी लावत वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला. चार तासांच्या या गोंधळात महापौरांनी तीनवेळा सभा तहकूब केली. शेवटी याप्रकरणी दोन नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापौरांनी दिले. पोलिसांनी विशेष कमांडो मागविल्यामुळे महापालिकेला छावणीचे स्वरूप आले होते. 

महापालिकेच्या सभेला दुपारी बाराला प्रारंभ होताच एमआयएमच्या नगरसेविका शेख समिना यांनी वंदे मातरम्‌चा विषय उपस्थित केला. मात्र महापौरांनी त्यांना मध्येच रोखत वंदे मातरम्‌ सुरू करण्याच्या सूचना केल्या. वंदे मातरम्‌ सुरू झाले; मात्र यावेळी एमआयएमचे सय्यद मतीन व काँग्रेसचे सोहेल शेख हे जागेवर बसून होते. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक रावसाहेब आमले यांनी हरकत घेत या सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

त्यानंतर राजू वैद्य, नंदकुमार घोडेले यांनीही कारवाईची मागणी केल्यानंतर एमआयएमच्या नगरसेवकांनी वंदे मातरम्‌ म्हणणार नाही, अशी भूमिका घेतली. त्याला विरोध करत शिवसेना-भाजप नगरसेवकांनी ‘इस देश में रहना है तो वंदे मातरम्‌ कहना है!, वंदे मातरम्‌, भारतमाता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद, जय भवानी जय शिवाजी’ अशा जोरदार घोषणा दिल्या.

एमआयएमच्या नगरसेवकांनीही हिंदुस्थान झिंदाबाद, महापौर मुर्दाबाद अशा घोषणा देत प्रत्युत्तर दिले. 

महापौरांनी वंदे मातरम्‌चा अवमान करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. मात्र कोणीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यामुळे सभा पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली. त्यानंतर सभा सुरू होताच पुन्हा घोषणाबाजीला सुरवात झाली. या गोंधळातच महापौरांनी सय्यद मतीन, सोहेल शेख, शेख समिना यांचे एका दिवसासाठी सदस्यत्व निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा केली. मात्र नगरसेवकांचा गोंधळ सुरूच असल्यामुळे महापौरांनी दुसऱ्यांदा सभा तहकूब केली. पाच मिनिटांनंतर सभा सुरू होताच राजू शिंदे यांनी ज्या नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, त्यांना सभागृहाबाहेर काढण्यात यावे, अशी मागणी केली. त्यामुळे संतप्त झालेले एमआयएमचे नगरसेवक महापौरांच्या आसनासमोर आले. त्यांनी राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. शिवसेना-भाजप नगरसेवकही त्यांना सामोरे गेले व दोन्ही गट एकमेकांना भिडले. कोणी माईक तोडले तर कोणी पंखा उचलून तोडफोडीचा प्रयत्न केला. यावेळी महिला नगरसेविकाही मागे नव्हत्या. दरम्यान, महिलांनी भारतमातेचे छायाचित्र आणून ते महापौरांना भेट दिले.

महापौरांनी दिले पत्र 
या गोंधळानंतर महापौरांनी सभागृहात तोडफोड केल्याप्रकरणी जफर बिल्डर, सय्यद मतीन यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. सायंकाळी यासंदर्भात आयुक्तांना पत्रही देण्यात आले आहे.

नेत्यांनी तापविले वातावरण 
वंदे मातरम्‌च्या विषयावरून सभागृहात युती-एमआयएमचे नगरसेवक भिडल्यानंतर महापालिकेत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. आमदार अतुल सावे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, भाजपचे शहरप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवकांनी महापालिकेच्या आवारातच जोरदार घोषणाबाजी करत वंदे मातरम्‌चे गायन केले. तर दुसरीकडे एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनीही महापालिकेच्या आवारात घोषणाबाजी करत जफर बिल्डर व सय्यद मतीन यांना उचलून घेत त्यांचा उदो उदो केला. 

पारदर्शक चौकशी करू - पोलिस आयुक्त
‘वंदे मातरम्‌’ला राष्ट्रगीताचे नियम नसले तरी अवमान व्हायला नको. या प्रकरणात तक्रार आल्यानंतर स्वतंत्र व पारदर्शक, निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करू. त्या संदर्भातील व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिली. महापालिकेत राडा झाल्यानंतर शिवसेना-भाजप युतीच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन ‘वंदे मातरम्‌’चा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर आमदार इम्तियाज जलील यांनी देखील त्यांची भेट घेऊन म्हणणे मांडले.

शिवसेना-भाजप, एमआयएम नगरसेवक भिडले
सभागृहातील माईक, खुर्च्यांची तोडफोड 
तीन नगरसेवकांचे एका दिवसासाठी निलंबन 
दोघांवर गुन्हे दाखल करण्याचे महापौरांचे आदेश
सर्वसाधारण सभा तीनवेळा तहकूब
चार तास सुरू होता ‘ड्रामा’ 
पोलिसांचा हस्तक्षेप; छावणीचे स्वरूप

वंदे मातरम्‌साठी मोबाईलचा आधार 
महापालिकेत वंदे मातरम्‌वरून चार तास गोंधळ सुरू असताना दुसरीकडे किती जणांना वंदे मातरम्‌ मुखोद्‌गत आहे, याचादेखील प्रत्यय आला. शिवसेना-भाजप युतीच्या नेत्यांना मोबाईलवर वाचून ‘वंदे मातरम्‌’ म्हणावे लागले.

नेमकी कशी पडली वादाची ठिणगी 
माजी उपमहापौर प्रमोद राठोड व एमआयएमचे जफर बिल्डर यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर दोघे एकमेकांच्या अंगावर धावून गेले. नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे, नासेर सिद्घीकी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्हींकडून रेटारेटी झाली. सभागृह नेते गजानन मनगटे, राजेंद्र जंजाळ, कचरू घोडके यांनी जफर बिल्डर यांना खेचले. त्यांना वाचविण्यासाठी एमआयएमचे सदस्य धावून आल्याने रेटारेटी झाली, त्यात नगरसेविकांनाही त्रास सहन करावा लागला. 

पोलिसांनी केला हस्तक्षेप 
सभेचे पीठासीन अधिकारी म्हणजेच महापौरांच्या परवानगीशिवाय सभागृहात कोणालाही प्रवेश नसतो. मात्र प्रचंड तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत सभागृहात प्रवेश केला. त्यांनी गोंधळी नगरसेवकांना धरून बळजबरी सभागृहाबाहेर काढले. त्यानंतर शिवसेना-भाजप युतीचे नगरसेवकही सभागृहाबाहेर आले. दोन्ही गट पुन्हा एकमेकांच्या अंगावर धावून गेले. यावेळीही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी विशेष कमांडोला पाचारण केल्यामुळे महापालिकेला छावणीचे स्वरूप आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com