दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात पुलाच्या कठड्याला धडकला कंटेनर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव कंटेनर पुलाच्या कठड्यावर धडकला. यात केबिनमध्ये झोपलेल्या क्‍लीनरच्या पोटात स्टिअरिंग घुसल्याने तो गंभीर जखमी झाला; तर चालकाला दुखापत झाली. हा अपघात बाळापूरफाटा, बीडबायपास येथे रविवारी (ता. पाच) पहाटे साडेपाचच्या सुमारास झाला. 

औरंगाबाद - दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव कंटेनर पुलाच्या कठड्यावर धडकला. यात केबिनमध्ये झोपलेल्या क्‍लीनरच्या पोटात स्टिअरिंग घुसल्याने तो गंभीर जखमी झाला; तर चालकाला दुखापत झाली. हा अपघात बाळापूरफाटा, बीडबायपास येथे रविवारी (ता. पाच) पहाटे साडेपाचच्या सुमारास झाला. 

अनिल हरी हराळे (वय २०, रा. उमरगा, जि. उस्मानाबाद) असे जखमी क्‍लीनरचे नाव आहे. दाऊद इस्माईल डांगे या चालकाला किरकोळ दुखापत झाली. तसेच स्वामी निळकंठ विरपक्षे हा दुसरा क्‍लीनर बालंबाल बचावला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीस टन मैद्याचा माल घेऊन दाऊद इस्माईन डांगे हा कंटेनरने अंमळनेर येथून हैदराबादला जात होता. पहाटे औरंगाबादेतील बाळापूर शिवारात कंटेनर आला. त्यावेळी अचानक समोरून दुचाकी आली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटून रस्त्याच्या मधोमध असलेल्या पुलाला कंटेनर धडकला. अपघात एवढा भीषण होता, की कंटेनरच्या काचा फुटल्या व समोरचा भाग पुलाच्या लोखंडी पाइपमध्ये अडकला. दरम्यान, चालकाच्या मागे केबिनमध्ये झोपलेला क्‍लीनर हराळे स्टिअरिंगवर आदळला. त्यामुळे पुलाचा लोखंडी भाग व स्टिअरिंग त्याच्या पोटात घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. दरम्यान, कंटेनरमध्येच असलेल्या स्वामी निळकंठेश्‍वर विरपक्षे या क्‍लीनरने अपघाताची बाब पोलिसांना कळवली. सिडको ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, उपनिरीक्षक सीताराम केदारे व त्यांचे पथक घटनास्थळी पोचले. त्या वेळी चालक आत अडकला होता, त्याला व अन्य एकाला कसेबसे बाहेर काढून पोलिसांनी घाटीत दाखल केले. या घटनेची नोंद एमआयडीसी सिडको ठाण्यात झाली.

असे काढले बाहेर
स्टिअरिंग घुसल्याने हराळे आतच अडकला होता. त्यामुळे पोलिस व अग्निशामक दलाच्या जवानांनी कटरने लोखंड कापून त्याला बाहेर काढले. त्यानंतर त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले.

क्रेनद्वारे काढला कंटेनर
रस्त्याच्या मधोमध पुलामध्ये कंटेनरही फसून काही भाग खाली गेला होता. त्यामुळे क्रेनच्या माध्यमातून पोलिस व अग्निशामक दलाच्या जवानांनी कंटेनर काढून रस्ता मोकळा केला.

जीव वाचविण्यासाठी आटापिटा..
दोघे आत अडकल्याने अग्निशामक दलाचे जवान व पोलिस हैराण झाले. त्यांना कसेही करून पोटात स्टिअरिंग अडकलेल्या अनिलचा जीव वाचवायचा होता. बराच वेळ त्याला काढण्याचे प्रयत्नही सुरू झाले; त्यानंतर लोखंडी रॉड व पोटाचा काही भाग कापून त्याला बाहेर काढून घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे घाटीतील डॉक्‍टरांनी सांगितले.

Web Title: aurangabad marathwada news container accident