आधी चहाला घरी बोलावले, नंतर अंगठी लुबाडली

आधी चहाला घरी बोलावले, नंतर अंगठी लुबाडली

त्र्याण्णव वर्षीय व्यक्तीसोबत घडला प्रकार; संशयित महिला अर्ध्या तासातच जेरबंद
औरंगाबाद - त्र्याण्णव वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला चहासाठी घरी नेले. त्यानंतर पैठण रस्त्याकडे शेतात नेऊन तीस हजारांची अंगठी लुबाडली. ही घटना सुदर्शननगर एन-अकरा ते पैठण रस्त्यावर रविवारी (ता. २३) सकाळी दहा ते साडेबारा वाजता घडली. यानंतर अर्ध्या तासात गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी महिलेला शोधून अटक केली व अंगठी जप्त केली.
 
सांडू सखाराम सिरसाठ (वय ९३, रा. हडको एन-११, साई मैदान) हे रविवारी सकाळी दहा वाजता फिरण्यासाठी घराबाहेर निघाले व बाळासाहेब ठाकरे उद्यानाजवळ त्यांना दयाबाई सुरेश मगरे ही अनोळखी महिला भेटली. तिने त्यांना एकटे पाहून आपली तीन वर्षांपूर्वी टीव्ही सेंटर भागात ओळख झाल्याचे सांगितले व चक्क चहा पिण्यासाठी घरी येण्याची विनंती केली.

सुरवातीला सिरसाठ यांनी नकार दिला. पण, तिने जास्तच गळ घातली. त्यामुळे सिरसाठ यांनी होकार दर्शविला. यानंतर महिलेने रिक्षाने त्यांना घरी नेले. चहा दिल्यानंतर आपल्या मुलीचे शेत दाखवण्याच्या बहाण्याने पुन्हा रिक्षाने त्यांना पैठण रस्त्यावर नेले. तेथील एका पत्र्याच्या शेडजवळ रिक्षा थांबवून सिरसाठ यांना उतरण्यास भाग पाडले. तेथील लक्ष्मीदेवीच्या चबुतऱ्याकडे नेत सिरसाठ यांना त्यांच्या हातातील अंगठ्या काढून देण्याची मागणी केली. त्यानंतर मारहाण करून हातातील अंगठी हिसकावून तिने पोबारा केला. अचानक घडलेल्या या प्रकाराने सिरसाठ घाबरले व हतबलही झाले. त्यानंतर त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सिडको पोलिस ठाण्यात जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद झाली. 

गळा आवळण्याची धमकी
दयाबाई मगरे हिने सिरसाठ यांना मारहाण केली. शिवाय फेट्याने गळा आवळू, अशी धमकीही दिली. त्यामुळे सिरसाठ यांचा नाइलाज झाला. त्यांच्या हातातील तीस हजार रुपये किमतीची अंगठी त्या महिलेने जबरदस्ती काढून घेतली. त्यांच्या कानातील बाळी ओरबडताना सिरसाठ यांनी आरडाओरड केली. त्यामुळे लोक जमा झाले व महिला घाबरून पसार झाली.

अर्ध्या तासात अटक
घटनेनंतर बिडकीन ठाण्यातील पोलिसाने महानुभाव चौकालगत पोलिस चौकीत सिरसाठ यांना सोडले. यानंतर घटनेची माहिती गुन्हे शाखेला देण्यात आली. त्यांच्या पथकाने सिरसाठ यांची चौकशी केली. दयाबाई मगरेचा याच भागात शोध घेऊन तिला ताब्यात घेत अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, नंदकुमार भंडारी, साईनाथ महाडीक, फारुख देशमुख, संजय धुमाळ, ओमप्रकाश बनकर, शिवाजी भोसले, विकास माताडे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com