बनावट फेसबुक अकाउंटद्वारे तो बोलायचा महिलांशी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - फेसबुकला काहीजण फेसलेस म्हणतात, ते काही खोटे नाही. फेसबुकद्वारे कधी कुणाची फसवणूक होईल याचाही नेम नाही. अशाच एका तरुणाने महिलेच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाउंट तयार केले. त्यानंतर फ्रेंड रिक्‍वेस्ट पाठवून मैत्रीच्या गोंडस नावाखाली अनेक महिलांशी अश्‍लील चॅटिंग करुन फसवणूक केल्याची खळबळजनक बाब उघड झाली. या तरुणाला गुरुवारी (ता. २१) सायबर सेलने बेड्या ठोकल्या.

शेख ओसामा शेख जफर हबीब (वय २५, रा. नॅशनल कॉलनी, औरंगाबाद) असे अटक झालेल्या तरुणाचे नाव आहे. एका महिलेला तिच्याच नावाचे अकाउंट फेसबुकवर दिसले. त्यामुळे तिला धक्काच बसला. याबाबत तिने औरंगाबादेतील सायबर सेलला तक्रार दिली. या प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर सायबर सेलच्या पथकाने तांत्रिक पद्धतीने तपास केला. त्यावेळी महिलेचे बनावट फेसबुक अकाउंट असल्याची बाब समोर आली. सखोल तपास करुन पोलिसांनी शेख ओसामा याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यानंतर आपण फेक अकाउंट तयार करुन महिलांशी अश्‍लील चॅटिंग केल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयित तरुणाला अटक झाली असून वेदांतनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई सायबर सेलचे सहायक निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक हेमंत तोडकर, पोलिस नाईक धुडकू खरे, नितीन देशमुख, विवेक औटी, रेवनाथ गवळे, ज्योती भोरे यांनी केली.  

अशी आहे शिक्षा...
बनावट फेसबुक अकाउंट तयार करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. या प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपीला अटक होते. तीन वर्षांपर्यंत कारावास व पाच लाख रुपये दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे बनावट फेसबुक अकाउंट तयार करणे अंगलट येऊ शकते, असे सायबर सेल पोलिसांनी सांगितले.

एक चूक पडेल महागात...
फेक फेसबुक अकाउंट तयार केल्यास तसेच सोशल साईटवरुन महिलांची छेड काढून बदनामी केल्यास याबाबतचे तांत्रिक पुरावे सहज प्राप्त होतात. त्यामुळे न्यायालयातही आरोपीला शिक्षा होण्याचे प्रमाण मोठ्या स्वरूपाचे आहे. त्यामुळे फेक अकाउंट तयार करुन छेड, बदनामी केल्यास चूक महागात पडू शकते. त्यामुळे वेळीच सावध राहण्याची गरज आहे.

Web Title: aurangabad marathwada news cyber crime