पेट का सवाल है, साहब... स्कूल कैसे जायेंगे?

औरंगाबाद - डोंबारी मुलगी लक्षवेधी कसरती करताना.
औरंगाबाद - डोंबारी मुलगी लक्षवेधी कसरती करताना.

औरंगाबाद - वेळ सकाळी साडेनऊची. दैनंदिन कामकाजासाठी औरंगाबादकरांचे जीवन नेहमीप्रमाणे घाईतच होते. 

त्यातच बीडबायपासवरील देवळाई चौकाच्या बाजूला दोन बांबूंवर बांधलेल्या दोरीवरील एका बालिकेच्या कसरती सर्वांचेच लक्ष वेधून घेत होत्या. त्या मुलीच्या कसरती पाहून घाईगडबडीत असणाऱ्या औरंगाबादकरांचे पावलेदेखील थबकली. ‘एवढ्या छोट्या मुलीला शाळेत घालण्याऐवजी जीवघेण्या कसरती कशाला करायला सांगतोस,’ असा सवाल एकाने विचारल्यावर डोंबाऱ्याने सांगितले ‘पेट का सवाल है साहब... स्कूल कैसे जायेंगे, काम तो करना पडता है वरना भुके मर जायेंगे’ या उत्तराने तो निरुत्तर झाला. 

एकीकडे बालकामगार विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे; मात्र डोंबारी बालवयातच अजाणत्या वयात मुलींकडून अंग मेहनतीचे जीवघेणे काम करून घेत आहेत. डोंबाऱ्याचा खेळ तसा कसरतीचा; परंतु अनेक दिवसांपासून हा खेळ दुर्मीळ होण्याच्या मार्गावर आहे. सोशल मीडिया, डिजिटलच्या दुनियेत सर्वच खेळ, कलांपासून प्रेक्षक दुरावला आहे. शनिवारी (ता. नऊ) छत्तीसगड येथील डोंबारी कुटुंबाने सकाळीच येथे त्यांचा खेळ सुरू केला. दोन्ही बाजूने बांबूला बांधलेल्या दोरीवर दहा ते बारा फुटांवरून बांबूच्या साह्याने बॅलन्स करीत चिमुरडीने कसरती सुरू केल्या. पायात चप्पल घालून दोरीवरून चालणे, डोक्‍यावर एकावर एक असे तीन तांबे ठेवून चालणे, सायकलची रिंग घेऊन चालणे, दोरीवर ठेवलेल्या थाळीत गुडघे टेकवून पुढे सरकणे आदी कसरती पाहून देवळाई चौकात जमलेले शहारले. 

पोटाची खळगी भरण्यासाठी अनेकांना रोज विविध कसरती कराव्या लागतात; पण छत्तीसगड येथील रहिवासी असलेल्या अवघ्या बारा वर्षांच्या कोवळ्या मुलीला कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी दोरीवर जीव टांगतीला लावून कसरत करावी लागत होती. कसरत करणाऱ्या मुलीची आई तिला धीर व प्रोत्साहन देण्यासाठी दोरखंडाभोवतीच घुटमळत होती. तिच्या मनाच्या एकाग्रतेसाठी चार्ज करून ठेवलेल्या बॅटरीच्या साह्याने गाणी लावली होती. येणारे जाणारे ही कसरत पाहून आपल्या परीने मदतीचा हात पुढे करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com