इलेक्‍ट्रिक वाहनांचे भागही औरंगाबादेत होणार तयार

इलेक्‍ट्रिक वाहनांचे भागही औरंगाबादेत होणार तयार

काळानुरूप होणाऱ्या बदलांवर कंपन्यांचे संशोधन सुरू 

औरंगाबाद - औरंगाबादचा ऑटो उद्योग जगभर नावाजलेला असून, आता काळाची पावले ओळखून आपले रूप बदलण्यासही या उद्योगाने सुरवात केली आहे. बजाज ऑटोच्या वतीने आणले जाणारे इलेक्‍ट्रिक ऑटो हे वाहन क्रांतिकारी पाऊल ठरणार असून, त्याला अनुरूप स्वतःमध्ये बदल करण्यासाठी येथील उद्योगांनी संशोधनाची कास धरली आहे. 

औरंगाबादेत असलेल्या ऑटो उद्योगाचा परिचय जगभरातील कंपन्यांना आहे. पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे सुटे भाग तयार करणाऱ्या येथील ऑटो उद्योगाचा ग्राहक जगभर पसरलेला आहे; पण काळानुरूप ऑटो उद्योगही आता आपल्यात बदल करीत आहे. आगामी दोन वर्षांत इलेक्‍ट्रिक ऑटोचे उत्पादन सुरू करण्यासाठी ‘बजाज ऑटो’ने तयारी चालविली असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने रविवारी (ता. २३) प्रसिद्ध केले होते. ऑटो कंपन्यांची ही पावले ओळखून ते करीत असलेले बदल स्वीकारण्यासाठी औरंगाबादेतील उद्योगांनीही पावले टाकायला सुरवात केली आहे. पारंपरिक इंधनावर काम करणाऱ्या वाहनांची निर्मिती ही शंभर टक्के बंद होणार नसली तरी त्यांच्या संख्येत मात्र घट होणार आहे. त्यामुळे आज इंजिन, फोर्जिंग, कास्टिंग आणि इंजिनचे सुटे भाग तयार करणाऱ्या कंपन्या ज्या प्रमाणात हे भाग तयार करतात त्यांच्यात नक्कीच घट होईल. त्या तुलनेत वाहनाला लागणारी स्टीअरिंग सिस्टीम, सस्पेन्शन, चेसीस हे भाग कोणत्याही गाडीसाठी महत्त्वाचेच असल्याने ते घडवत असलेल्या सुट्या भागांच्या संख्येत फार फरक पडणार नाही. केवळ तीनचाकी नव्हे, तर कार आणि दुचाकींमध्येही इलेक्‍ट्रिक गाड्यांचा ट्रेंड येणार आहे. या क्रांतिकारी बदलाशी समरस होण्यासाठी औरंगाबादच्या ऑटो उद्योगांनी काम सुरू केले आहे. नव्या वाहनांच्या गरजा ओळखून त्यावर संशोधनही सुरू केले आहे.

भविष्यात येऊ घातलेल्या या ई-वाहनांचे सुटे भागही औरंगाबादेतच तयार होतील असा विश्वास उद्योजक व्यक्त करतात.  

स्टीलचे भाग घटणार, प्लास्टिकला वाव
इलेक्‍ट्रिक आणि पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचा बनावटीत मोठा फरक असतो. इलेक्‍ट्रिक गाड्यांमध्ये वजन कमी ठेवावे लागणार असल्याने त्यातील स्टीलच्या भागांचा वापर घटणार आहे. इलेक्‍ट्रिक गाड्यांचा वेग तुलनेने कमी असल्याने त्यांच्या सुरक्षेच्या मापदंडांबाबतही बदल होणार, हे नक्की. त्यामुळे त्यासाठीचे भाग तयार करणाऱ्या कंपन्यांनाही स्वतःमध्ये बदल करावे लागणार आहेत. 

औरंगाबादेतील उद्योगांनी आगामी काळातील बदल ओळखून नवे तंत्रज्ञान अंगिकारण्यास सुरवात केली आहे. त्या आधारावर औरंगाबादेतील उद्योगांनी स्वतः संशोधन सुरू केले आहे. ज्यामुळे त्यांना स्पर्धेत टिकण्यास फायदाच होईल. इंजिनशी निगडित सुटे भाग तयार करणाऱ्या औरंगाबादेतील उद्योगांचे उत्पादन काही अंशी घटेल; पण त्यांची जागा इलेक्‍ट्रिक वाहनांचे भाग घेतील.
- राम भोगले, उद्योजक

बजाज ऑटोसाठी सीएमआयए कायमच सकारात्मक राहिली असल्याचे यापूर्वीच्या अनेक प्रकल्पांमधून सांगता येईल. ई-रिक्षा औरंगाबादेत तयार होणे भूषणावह आहेच; शिवाय त्यासाठी लागणाऱ्या इकोसिस्टीमवर बजाज ऑटोशी संलग्न कंपन्या अगोदरपासून काम करीत आहेत आणि त्यासाठी लागणारे प्लास्टिक, कार्बन फायबर आणि अन्य सुटे भाग हे औरंगाबादेतच तयार होतील. त्यासाठीची इको सिस्टीम तयार करण्यावरही काम सुरू आहे.
- प्रसाद कोकीळ, अध्यक्ष, सीएमआयए

इलेक्‍ट्रिक वाहनांमध्ये लागणाऱ्या तंत्रज्ञानात पारंपरिक इंजिनच बाद होते. स्वतःला बदल करण्याची प्रक्रिया सुरू असली तरी त्यात विश्वासार्हता कायम राखून आपले उत्पादन करावे लागेल. ‘इनपूट ते आऊटपूट’ पूर्ण तंत्रज्ञान बदलणार असल्याने सध्या कंपन्या या विषयात मंथन करीत आहेत. त्या आपल्यात बदल करतील, तो करावाच लागेल.
- सुनील किर्दक, अध्यक्ष, मसिआ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com