‘सिद्धार्थ’मधील साखळदंडांचा खळखळाट बंद

औरंगाबाद - लक्ष्मीच्या पोटाला पट्टा लावून क्रेनच्या साहाय्याने कधी ओढत, तर कधी चुचकारत वाहनात चढवताना प्राणिसंग्रहालयाचे कर्मचारी.
औरंगाबाद - लक्ष्मीच्या पोटाला पट्टा लावून क्रेनच्या साहाय्याने कधी ओढत, तर कधी चुचकारत वाहनात चढवताना प्राणिसंग्रहालयाचे कर्मचारी.

औरंगाबाद - सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील मायलेकी सरस्वती आणि लक्ष्मी या हत्तिणींच्या विशाखापट्टणम्‌कडील प्रवासाला रविवारी (ता. १०) दुपारी दीड वाजता सुरवात झाली. शनिवारी वाहनात या दोघींना चढविताना माहुतांना चांगलाच घाम फुटला होता. यामुळे प्रयत्न अर्धवट सोडावे लागले होते; परंतु रविवारी सरस्वती पाच मिनिटांत वाहनात चढली; तर लक्ष्मीला क्रेनच्या मदतीने वाहनात ओढत न्यावे लागले.

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण आणि न्यायालयाच्या आदेशानंतर गेल्या आठवड्यात विशाखापट्टणम्‌ येथील इंदिरा गांधी झुलॉजिकल पार्कच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेला पत्र पाठवून आम्ही नऊ डिसेंबरला हत्तींना नेण्यासाठी येत असल्याचे कळविले होते. त्यानुसार शनिवारी सकाळीच विशाखापट्टणम्‌ येथील डॉ. नवीन कुमार, केअर टेकर एम. के. रामकृष्णा यांच्या नेतृत्वाखाली पथक दाखल झाले. यानंतर महापालिका प्रशासनाने कागदपत्रांसह आवश्‍यक तयारी केली; मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहतूक परवानगी देण्यास उशीर लावला. पोकलेन मागवून हत्तींना वाहनात चढविण्यासाठी मातीचा उंचवटा तयार करण्यात आला. प्राणिसंग्रहालयाचे डॉ. खाजा मोईनोद्दीन यांनी दोघींची वैद्यकीय तपासणी करून त्यांची तब्येत ठीक असल्याची खात्री केली होती; पण शनिवारी त्यांना वाहनात चढविण्यास अपयश आले. त्यामुळे दोघींचा मुक्‍काम एका रात्रीसाठी वाढला. रविवारी या दोघींना विशाखापट्टणम्‌ला रवाना करण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू झाले.

सकाळी दहा वाजता सुरवातीला लक्ष्मीला वाहनात चढविण्यास सुरवात झाली; मात्र लक्ष्मीने दोन तास माहुतांना व कर्मचाऱ्यांना घाम फोडला. अखेर क्रेन मागविण्यात आली. क्रेनचा पट्टा बांधून ओढल्यानंतर अवघ्या काही क्षणातच लक्ष्मी वाहनात चढली. 

लक्ष्मीचा धसका
सिद्धार्थ उद्यानात प्राणिसंग्रहालय सुरू झाल्यानंतर १९९६ मध्ये महापालिकेने कर्नाटकच्या म्हैसूर येथील सफारी पार्कमधून शंकर आणि सरस्वती ही हत्तींची जोडी आणली होती. या दोघांपासून १९९७ मध्ये लक्ष्मी या हत्तिणीचा जन्म झाला. त्यानंतर १९९८ मध्ये शंकरचा मृत्यू झाला. तेव्हापासून सरस्वती आणि लक्ष्मी या दोघी मायलेकी प्राणिसंग्रहालयात होत्या. जोडीदार नसल्यामुळे तारुण्यात आलेल्या लक्ष्मीने काही दिवसांपूर्वी प्राणिसंग्रहालयात हैदोस घातला होता. यात भागीनाथ म्हस्के नामक माहूत गंभीर जखमी झाला. तेव्हापासून तिची सर्वांनीच धास्ती घेतली होती.

दूध डेअरीपर्यंत पाठवण
दोघींना वाहनात चढविल्यानंतर वाहन बसस्थानक, गरमपाणी, छावणी मार्गे जालना रोडला लागले. उघड्या ट्रकमध्ये या दोघी असल्याने त्या सोंड बाहेर काढण्याची शक्‍यता होती. यामुळे रस्त्यावरची वाहतूक बाजूला करीत प्राणिसंग्रहालयातील कर्मचारी मोहंमद झिया, तमीज पठाण, संदीप बनकर, अमोल मघाडे, विनोद राठोड, प्रवीण बत्तीसे वाहनांच्या बरोबर क्रांती चौकाच्या पुढे दूध डेअरीपर्यंत त्यांना पाठविण्यासाठी गेले. तिथून पुढचा प्रवास सुरळीत होण्याचा अंदाज आल्यानंतर सर्वजण परतले. दरम्यान, सरस्वती-लक्ष्मीला सुखरूप पोचविण्यासाठी त्यांची प्राणिसंग्रहालयात रोज काळजी घेणारे रामदास चव्हाण आणि भागीनाथ म्हस्के या माहुतांनाही सोबत पाठविण्यात आल्याचे प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com