अकरावीच्या ऑनलाइन अर्जाचा आज शेवटचा दिवस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थी-पालकांचा उडाला गोंधळ

औरंगाबाद - शहरात यंदा पहिल्यांदाच अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. त्याअंतर्गत मंगळवारी (ता. २७) सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. मात्र, अजूनही संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळ उडाला असून, दिलेल्या मुदतीत अर्ज करता येईल की नाही, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन राबविली जात आहे. प्रवेशप्रक्रियेसंदर्भात ऑनलाइन पार्ट एक आणि पार्ट दोन पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचाच बुधवारी (ता. २८) प्रसिद्ध होणाऱ्या पहिल्या गुणवत्तायादीसाठी विचार करण्यात येणार आहे.

प्रवेश अर्ज ऑनलाइन केला आहे. मात्र, पार्ट एक आणि पार्ट दोन अपूर्ण आहे, अशा विद्यार्थ्यांनी पूर्ण प्रवेश अर्ज अचूक भरावा, महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या मूळ शाळेतून; तर महापालिका क्षेत्राबाहेरील विद्यार्थ्यांनी कोणत्याही झोन केंद्रावरून त्यांचा ऑनलाइन प्रवेश अर्ज आवश्‍यक कागदपत्रे दाखवून मंगळवारी दुपारी चार वाजेपर्यंत व्हेरिफाय करून घ्यावा, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. ऑनलाइन प्रवेश अर्ज भरताना काही चूक झाली असल्यास ती मूळ शाळेत किंवा झोन केंद्रावर जाऊन दुरुस्त करता येणार आहे. 

अशी झाली नोंदणी 
महापालिका क्षेत्रातील १०४ महाविद्यालयांसाठी अकरावीचे प्रवेश ऑनलाइन करण्यात आले आहेत. या महाविद्यालयांत २२ हजार ४०० जागा असून, २५ जूनच्या सायंकाळी पाच वाजतापर्यंत १७ हजार १०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, अशी माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे भास्कर बाबर यांनी सांगितली. 

या आहेत अडचणी
अकरावी प्रवेशप्रक्रियेसंबंधीची माहिती पुस्तिका विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. मात्र, पुस्तिकेतील माहिती आणि संकेतस्थळावरील माहितीत बराच फरक असल्याच्या तक्रारी पालक, विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. पुस्तिकेतील महाविद्यालये संकेतस्थळावर सापडत नाहीत; तसेच संकेतस्थळावर लोड आल्याने तेही तासन्‌तास सर्व्हर डाउन राहत आहे. शिवाय प्रवेश मंजूर करून घेण्यासाठी मुख्याध्यापकांची परवानगी लागत असल्याने विद्यार्थ्यांना शाळा-झोन केंद्र अशी वारी करावी लागत आहे.