रुग्ण सुविधेसह डॉक्‍टर, कर्मचारी भरतीची प्रतिज्ञापत्राद्वारे हमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

घाटी, कर्करोग, चिकलठाणच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मुदतीत हमीच्या पूर्ततेचे खंडपीठाचे आदेश

घाटी, कर्करोग, चिकलठाणच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मुदतीत हमीच्या पूर्ततेचे खंडपीठाचे आदेश

औरंगाबाद - मराठवाड्यासह लगतच्या जिल्ह्यांतील रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविणारे घाटी रुग्णालय, नव्याने सुरू झालेले कर्करोग रुग्णालय, चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रुग्णसेवेसाठी आवश्‍यक मूलभूत सोयी-सुविधा, पुरेसे डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांच्या नेमणुकांसंदर्भात राज्य शासनातर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात प्रतिज्ञापत्राद्वारे हमी देण्यात आली. न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी, न्यायमूर्ती एस. एस. पाटील यांनी ही हमी स्वीकारून ठराविक मुदतीत सर्व बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश दिले.

घाटी, कर्करोग आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य सुविधा, पायाभूत सुविधांची दुरवस्था, निधीची चणचण, अपुरा कर्मचारीवर्ग, डॉक्‍टरांची रिक्त पदे याची स्वतःहून दखल घेत खंडपीठाने दोन याचिका (सुमोटो)दाखल करून घेतल्या होत्या; तसेच याबाबत अशोक गोवर्धन गिते यांनीही एक याचिका दाखल केली होती. या सर्व याचिकांवरील एकत्रित सुनावणीदरम्यान खंडपीठाने सर्व प्रतिवादींना प्रतिज्ञापत्र सादर करून म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले. यात म्हटले आहे, की रुग्णालयात वर्ग चारच्या १७५ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.

त्यांची आउटसोर्सिंगच्या माध्यमातून भरती करण्यासाठी दहा दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येईल. यानुसार प्रस्ताव सादर करण्यात आला असून, तो आरोग्य संचालकांनी मंजूरही केला आहे. एक तांत्रिक पद १५ दिवसांत पदोन्नतीने भरले जाईल. पाच प्राध्यापक, १७ सहायक प्राध्यापकांच्या रिक्त पदांसाठी जाहिरात देऊन तीन महिन्यांत ही पदे भरण्यात येतील. ग्रंथालयाची इमारत, पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह एप्रिल २०१६ पासून तयार आहे; परंतु इमारत आणि वसतिगृहात फर्निचर नाही, असे यात नमूद करण्यात आले. दोन्ही विषयांवर खंडपीठाने नाराजी व्यक्त करून, ग्रंथालयासाठी ९६ लाख, वसतिगृहासाठी १६ कोटी ५२ लाख रुपयांच्या तरतुदीसाठी १५ दिवसांत आवश्‍यक मंजुरी व्हावी, असे निर्देश खंडपीठाने दिले. रुग्णांच्या आरोग्याची काळजी असेल तर या सर्व बाबींच्या पूर्ततेसाठी लवकरात लवकर कार्यवाही करावी, असेही खंडपीठाने म्हटले आहे. 

कर्करोग रुग्णालयातील पदे लवकरच भरणार 
कर्करोग रुग्णालयाबाबत डॉ. अरविंद गायकवाड यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात, महापालिकेशी संबंधित विषय लवकरात लवकर सोडवू, असे म्हटले आहे. या रुग्णालयात कार्यरत कनिष्ठ डॉक्‍टरांच्या वेतनश्रेणीबाबत ३० सप्टेंबरपर्यंत योग्य ती कारवाही करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. या रुग्णालयात संशोधकांच्या २४ जागा असून, त्या रिक्त आहेत. त्या भरतीसाठी नियमच तयार करण्यात आलेले नाहीत. या मुद्यांवर, असे नियम एका महिन्यात तयार करण्यात येतील, असे शासनातर्फे सांगण्यात आले. प्राध्यापकांच्या १४ जागा; तसेच ३२ सहायक प्राध्यापक, ९० परिचारिका यांची भरती पुढील सुनावणीपर्यंत (ता. नऊ नोव्हेंबर) करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. प्रयोगशाळा सहायकाचे पद हे आधीपासूनच सेवेत असलेल्यांमधून पदोन्नतीने ३१ ऑगस्टपर्यंत भरले जाण्याची हमी देण्यात आली.

ता. ३० ऑक्‍टोबरपर्यंत सुरू होणार जिल्हा सामान्य रुग्णालय
चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील पाण्याच्या समस्येसंदर्भात नवीन ५० मि.मी. पाइपलाइनसाठीचे काम पीडब्ल्यूडीने  १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देशही देण्यात आले. या रुग्णालयात आवश्‍यक डॉक्‍टर, इतर कर्मचारी; तसेच सुरक्षारक्षकांची भरतीच न केल्याबद्दल खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. या ठिकाणी मंजूर २७८ पैकी न भरलेली १५७ पदे बदल्यांद्वारे भरण्यात येतील, असे निवेदन खंडपीठात करण्यात आले. ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करून रुग्णालय सुरू करू, असे निवेदन शासनातर्फे करण्यात आले. यासाठी एक कोटी ३० लाख रुपयांची आवश्‍यकता असून, हा निधी पुरविण्यात यावा, असे निर्देश खंडपीठाने दिले.

या प्रकरणात न्यायालयाचा मित्र म्हणून ॲड. आनंद भंडारी, ॲड. अनिरुद्ध निंबाळकर, ॲड. रवींद्र गोरे, शासनातर्फे ॲड. अमरजितसिंग गिरासे, महापालिकेतर्फे ॲड. संभाजी टोपे, एमपीएससीतर्फे ॲड. मुकुल कुलकर्णी, हस्तक्षेप अर्ज करणाऱ्यांतर्फे ॲड. वसंतराव साळुंके, ॲड. प्रदीप देशमुख, जीवन प्राधिकरणातर्फे ॲड. डी. पी. बक्षी यांनी काम पाहिले.

विविध कामांसाठी १० ऑक्‍टोबरपर्यंत मुदत
घाटी रुग्णालयांतील ड्रेनेजच्या लिकेज, ब्लॉकेज दुरुस्तीसाठी सत्तर लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता घेऊन ३० ऑक्‍टोबरपर्यंत काम पूर्ण करावे. सिटी स्कॅन यंत्रासाठीच्या सिटी ट्युबसाठी ४३ लाख रुपये, संरक्षक भिंतीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे १५ दिवसांत प्रस्ताव पाठवावा, त्यांनी याबाबत दहा दिवसांत आवश्‍यक ती प्रक्रिया करून ता. १० ऑक्‍टोबर २०१७ पर्यंत हे काम सुरू करावे, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे.