मराठवाडा स्थलांतराच्या उंबरठ्यावर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

पोटाची खळगी भरण्यासाठी लाखो कुटुंबांची शहरांकडे धाव
औरंगाबाद - खरीप पिकांचा पाचोळा अन्‌ शेतीचे सरण झाल्याने मराठवाड्यात दुष्काळाची विदारक स्थिती निर्माण झाली आहे.

पोटाची खळगी भरण्यासाठी लाखो कुटुंबांची शहरांकडे धाव
औरंगाबाद - खरीप पिकांचा पाचोळा अन्‌ शेतीचे सरण झाल्याने मराठवाड्यात दुष्काळाची विदारक स्थिती निर्माण झाली आहे.

मराठवाड्यात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने शेतीत कोणत्याही प्रकारचे काम शिल्लक नाही. परिणामी गावे, वाड्या, वस्ती, तांडे भकास झाले आहेत. विहिरींनी तळ गाठला असल्याने पिण्याच्या पाण्याचीसुद्धा चिंताजनक स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने बहुतांश जणांनी आता कामाच्या शोधासाठी कुटुंबासह शहराकडे स्थलांतर करण्याचा निर्णय पक्का केला आहे. येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस झाला नाही; तर मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होण्याची शक्‍यता आहे.

ग्रामीण भागात खरीप पिके हातातून गेल्याने ग्रामस्थांसमोर पोटाची खळगी भरण्याची गंभीर समस्या उद्‌भवली आहे. पावसाळ्यात मराठवाड्यातील अनेक गावांत किमान सहा ते आठ महिने तरी कामे मिळतात. मात्र, पाऊसच नसल्याने मराठवाड्यातील गावे भकास झाली आहेत. येथे कोणत्याही प्रकारची कामे नाहीत. दुकानातसुद्धा ग्राहक मिळेनासे झाले आहेत. पावसाळ्यातील हंगामी कामे मिळण्याची आशा संपल्याने पुन्हा "शहराकडे चला' असे म्हणण्याची वेळ कित्येक कुटुंबांवर आली आहे. आपल्या कुटुंबाला किमान दोन वेळेचे जेवण तरी मिळावे यासाठी तालुक्‍यातून बहुतांश कुटुंबांचे स्थलांतर करण्याचे नियोजन सुरू आहे. यामध्ये अनेक कुटुंबे मुंबई, पुणे, पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत कामाच्या शोधात स्थलांतरित होण्याचा विचार करताना दिसतात. काही कुटुंबांनी स्थलांतर केले आहे.

आगामी काळात पाऊस झाला नाही, तर स्थलांतर करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात जाण्याची शक्‍यता आहे. बीड जिल्ह्यातील अनेक जण ऊसतोडीसाठी पश्‍चिम महाराष्ट्रात जातात; तर इतर जिल्ह्यांतील तरुण हे शहरांकडे मिळेल ते काम करण्याच्या तयारीने येत आहेत.

रोजगारासाठी वणवण
गावाकडे काम नसल्याने सध्या औरंगाबाद शहरातील सर्वच कामगार नाक्‍यांवर गावाकडून स्थलांतरित होऊन आलेले तरुण कुटुंबासह कामाच्या शोधात उभे असतात. ते अकुशल असल्याने त्यांचा सर्वाधिक कल इमारत बांधकाम, मातीकामाकडे जास्त असतो. सध्या इमारत बांधकामाची ठराविकच कामे सुरू आहेत, त्यामुळे या सर्वच तरुणांना काम मिळणे अवघड झाले. काही तरुण हॉटेल, दुकानांत किंवा रखवालदाराचे काम करतात. अनेक तरुणांनी रिक्षा चालवून रोजगार मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. काही महिला शहरात धुणेभांड्याचे काम करतात.