शाडूच्या नावाखाली विकला जातोय फायर क्‍ले!

संकेत कुलकर्णी
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

नैसर्गिक मातीचाच गणपती इको-फ्रेंडली

औरंगाबाद - प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्याय म्हणून शाडू मातीच्या गणेशमूर्ती बसवण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींकडून केले जाते. मात्र सध्या शाडू मातीच्या नावाखाली ‘फायर क्‍ले’च्या मूर्ती बाजारात आल्या आहेत. ही माती पर्यावरणपूरक तर नाहीच; शिवाय त्यातील रासायनिक घटक अपायकारक असल्याचे समोर येत आहे.

नैसर्गिक मातीचाच गणपती इको-फ्रेंडली

औरंगाबाद - प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्याय म्हणून शाडू मातीच्या गणेशमूर्ती बसवण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींकडून केले जाते. मात्र सध्या शाडू मातीच्या नावाखाली ‘फायर क्‍ले’च्या मूर्ती बाजारात आल्या आहेत. ही माती पर्यावरणपूरक तर नाहीच; शिवाय त्यातील रासायनिक घटक अपायकारक असल्याचे समोर येत आहे.

शाडू मातीचा गणपतीबाप्पा इको फ्रेंडली असल्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती अनेक जण नाकारू लागले आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागरिकांबरोबरच मंडळे आणि शाळाही पुढाकार घेत आहेत. याबाबत जागृती वाढली, तशी शाडूच्या मूर्तींची मागणीही वाढली. मात्र मुंबई, गुजरात भागात मिळणारी पांढुरकी शाडू माती आता गायब झाली आहे. त्याऐवजी हुबेहूब तशाच दिसणाऱ्या फायर क्‍ले, बॉम्बे क्‍ले किंवा चायना क्‍लेच्या मूर्ती विकून ग्राहकांची फसवणूक होत आहे.

शाडूचे जाणकार आणि मूर्तिकार प्रमोद डवले यांनी सांगितले, की गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानात ओसाड वाळवंटातील निःसत्व मातीच्या खाणी, मोठमोठ्या कारखान्यांच्या बॉयलरमधील धातुमिश्रित राख आणि पांढऱ्या मातीचे ठिसूळ दगड फोडून बनवलेली भुकटी महाराष्ट्रात सर्वत्र शाडू माती म्हणून विकली जाते. मुंबईत याचे मोठे पुरवठादार आहेत. यात कोणतेही जैविक घटक नसल्याने ती विसर्जनानंतर आपल्याकडील मातीत एकजीव होत नाही. ‘नॅचरल क्‍ले’चे लेबल लावून बाजारात किलोने मिळणाऱ्या या क्‍लेची किंमत केवळ १५०० रुपये टन इतकी आहे. मात्र त्याची एकेक किलोची पाकिटे बनवून व्यावसायिकांनी चांगलाच धंदा मांडला आहे. नागरिकांनी फसवणुकीला बळी न पडता केवळ नैसर्गिक मातीच्याच मूर्ती घरी आणून किंवा स्वतः बनवून स्थापन कराव्यात, असेही ते म्हणाले.

शाडूच्या मूर्ती बनविण्याची ‘सकाळ’तर्फे कार्यशाळा
शालेय विद्यार्थ्यांना ‘सकाळ’तर्फे पर्यावरणपूरक शाडूच्या गणेशमूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. रविवारी (ता. २०) सकाळी दहाला ‘सकाळ’ कार्यालयात ही प्रशिक्षण कार्यशाळा होणार आहे. प्रत्येक शाळेतून निवडक विद्यार्थ्यांना यात प्रवेश दिला जाणार आहे. मूर्तिकार प्रमोद डवले विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार असून, त्यासाठी माती आणि पाणी पुरवले जाईल. प्रशिक्षणार्थींनी पाण्यासाठी मग, नॅपकिन, पुठ्ठा, ब्रश, फुटपट्टी आणि दोन-तीन आईस्क्रीम स्टिक्‍स सोबत आणायच्या आहेत.

जैविक शाडूचे परीक्षण
कथित शाडूमुळे होणारी पर्यावरणाची हानी आणि ग्राहकांची फसवणूक पाहून प्रमोद डवले यांनी चार वर्षांपूर्वी यावर संशोधन सुरू केले. बाजारातील शाडूमुळे ठिसूळ मूर्ती भंगण्याबरोबरच, विसर्जनानंतर कुंडीतील रोपेही मरत असल्याचे दिसले. त्यांनी काळी चिकणमाती, मुरुम, पोयटा, लाल माती व कॅल्शियमयुक्त खड्यांची माती एकत्र करून शाडू माती तयार केली. या मातीला तडे न जाता मूर्ती पक्की बनली. या मातीत गहू पेरल्यावर ते अंकुरले आणि याच मातीचे गणपती इको-फ्रेंडली असल्याचे सिद्ध झाले.

कशी ओळखाल बॉम्बे क्‍ले?
बाजारातील मूर्तीच्या शाडू मातीवरून हात फिरवल्यास हाताला भुकटी लागते. मूर्ती बनवण्यासाठी ही माती हाताळताना उडणारी धूळ नाकातोंडात जाऊन श्‍वसनाचे आजार होतात. माती भिजवताना पाण्यात सहज एकरूप होत नाही. त्यात काहीसा तेलकटपणा जाणवतो. या ठिसूळ मूर्तीला तडे जातात. कुंडीत विसर्जन केल्यास मातीला भेगा पडून रोप मरते. विरघळलेली मूर्ती नैसर्गिक मातीत एकरूप होतच नाही.

जलप्रदूषण होते म्हणून प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर टाळण्याचे आवाहन केले गेले. मात्र त्यामुळे मातीच्या मूर्ती बनवण्याला प्रोत्साहन मिळण्याऐवजी फायर क्‍ले, चायना क्‍लेचा बाजार वाढला. हे इको-फ्रेंडली नक्कीच नाही. त्यातील ॲल्युमिनिअम आणि सिलिका हे घटक कारागिराच्या आरोग्याला घातक आहेत. त्यामुळे हे वापरू नये, असे माझे मत आहे.
- सुरेश चोपणे, सदस्य, क्षेत्रीय सशक्त समिती, केंद्रीय पर्यावरण मंत्रालय.