‘घाटी’त रात्री उद्‌भवणाऱ्या समस्यांवर निघणार तोडगा

‘घाटी’त रात्री उद्‌भवणाऱ्या समस्यांवर निघणार तोडगा

अठरा दिवसांपासून पथकामार्फत पाहणी - अपघात विभागात वादावादी बंद

औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (घाटी) गेल्या अठरा दिवसांपासून तीन डॉक्‍टरांचे पथक रात्रीच्या वेळी पाहणी व समस्या जाणून घेण्यासाठी फिरत आहे. त्यानिमित्ताने का होईना, अपघात विभागात कायम होणारी ओरड, तक्रारी व भांडणे थांबल्याचे सध्या जाणवत आहे. 

‘घाटी’त रात्री होणारी रुग्णांची हेळसांड, काही कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा, कर्मचारी, डॉक्‍टरांना रात्रीच्या वेळी येणाऱ्या समस्या, अपघात विभागात रुग्णांच्या नातेवाइकांचा निवासी डॉक्‍टरांशी होणारा वाद यावर तोडगा निघावा, यादृष्टीने अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी पावले उचलली.

डॉक्‍टर्स डेपासून महिनाभर प्रत्येक रात्री तीन डॉक्‍टर प्रत्येक वॉर्डची पाहणी करून समस्या जाणून घेतील. त्याचा अहवाल अधिष्ठातांना सादर करतील असा उपक्रम हाती घेतला. डॉक्‍टरांच्या तीन सदस्यांच्या टीमने पाहणीच्या निमित्ताने का होईना ‘घाटी’चा रात्रीचा कारभार काहीसा सुरळीत झाल्याचे सध्याचे चित्र मंगळवारी (ता. १८) पाहायला मिळाले.  

अपघात विभागात मंगळवारी रात्री आठला जीवरसायनशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. एस. बी. गायकवाड, शरीरक्रिया विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सय्यद अशफाक, अस्थिरोग विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. अब्दुल अन्सारी, समाजसेवा अधीक्षिका अनुसया घोंगडे यांची टीम दाखल झाली. त्यावेळी तेथील रुग्णसंख्या, औषधांची उपलब्धता, ड्युटीवरील कर्मचारी संख्या, समस्या जाणून घेत रक्तपेढी, ओटी एक ते ओटी चार, ट्रामा केअर, आयसीयू, प्रसूतिकक्ष, एनआयसीयू, बालरोग वॉर्ड, मध्यवर्ती प्रयोगशाळा, सीटी स्कॅन, प्रिझनरी वॉर्ड, औषधी विभागातील वॉर्ड, एमआयसीयू, डायलेसिस वॉर्डची पाहणी केली. त्यानंतर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल जोशी यांना माहिती दिली. त्यानंतर रात्री दोन व सकाळी सहा वाजता पुन्हा पाहणी करून अधीक्षक कार्यालयास अहवाल दिला. या पथकाशी संवाद साधला असता पहिला दिवस असल्याचे त्यांनी सांगितले. नाईट सुपर असलेल्या पर्यवेक्षिका राधिका कॅदल यांनी या पाहणीमुळे आमच्या समस्या प्रशासनाच्या नजरेस येत आहेत व त्यावर तोडगा निघेल, असा विश्वास वाटत असल्याचे सांगितले. पथकासोबत गेल्या अठरा दिवसांपासून रोज ड्युटीवर असणारे रवींद्र दाभाडे यांनी सांगितले की, अपघात विभाग व रात्री वॉर्डात होणारे वाद या अठरा दिवसांत आढळले नाहीत. 

महिनाअखेर डॉक्‍टरांच्या पाहणीत आढळलेल्या समस्या, त्रुटींवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रात्रीचे सुपरव्हिजन होत आहे. त्यामुळे वचक निर्माण झाला आहे. काही समस्यांवर तत्काळ उपाययोजना केल्या.
- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी, औरंगाबाद. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com