आजी-आजोबांना आता जावे लागत नाही उघड्यावर!

औरंगाबाद - जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावाने विद्यार्थ्यांनी पाठवलेली पत्रे.
औरंगाबाद - जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावाने विद्यार्थ्यांनी पाठवलेली पत्रे.

४०० शाळकरी मुलांनी पत्राद्वारे कळविले मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सकारात्मक बदल
औरंगाबाद - गावांना पाणंदमुक्‍त करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या वैयक्‍तिक स्वच्छतागृहामुळे माझ्या आजी-आजोबांचा त्रास खूप कमी झाला. स्वच्छतागृहामुळे आरोग्य चांगले राहिल्याने आमच्या कुटुंबीयांचा आरोग्यावरील खर्चही कमी झाला आहे, ही प्रतिक्रिया आहे स्वच्छतागृह बांधलेल्या कुटुंबातील आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची. तिच्यासह ४०० विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांना पत्राद्वारे स्वच्छतागृहांमुळे झालेले सकारात्मक बदल कळविले आहेत.  

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत वैयक्‍तिक स्वच्छतागृह बांधण्याच्या बाबतीत खुलताबाद तालुक्‍याने शंभर टक्‍के उद्दिष्ट साध्य केले. त्याखालोखाल फुलंब्री तालुक्‍यात ९६ टक्‍के उद्दिष्ट पूर्ण झाले. फुलंब्री तालुक्‍यातील ४०० विद्यार्थ्यांनी स्वच्छतागृहाविषयी पत्रे पाठवून आपल्या भावना व्यक्‍त केल्यात. फुलंब्री तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवीमध्ये शिकणाऱ्या सताळा पिंप्रीची विद्यार्थिनी वैष्णवी देवरे हिने लिहिले, ‘ताईला बघायला पाहुणे आले होते, तेव्हा तिने तुमच्याकडे स्वच्छतागृह आहे का असे विचारले, असेल तरच लग्न करीन, असेही सांगितले. आम्ही एप्रिल २०१२ मध्ये स्वच्छतागृह बांधले. माझ्या आजी-आजोबांना पूर्वी उघड्यावर जावे लागायचे. त्यांची ही गैरसोय आता टळली आहे’, असे तिने पत्रातून म्हटले. 

शिरोडी (बुद्रुक) शाळेतील इयत्ता सहावीमध्ये शिकणारी शिवानी लहाने म्हणते, ‘माझ्या घरी स्वच्छतागृह आहे याचा मला अभिमान आहे. ज्या घरी स्वच्छतागृह आहे तिथेच लग्न करून जाईन. स्वच्छतागृहाचा वापर न करणाऱ्यांचे सरकारने अनुदान बंद करावे’, अशी सूचनाही तिने पत्राद्वारे केली. रेणुका शिंदे, माधुरी जाधव, ऋत्त्विक भागवत या विद्यार्थ्यांनीही पत्राद्वारे स्वच्छतागृह असल्याचे फायदे सांगून काही मौलिक सूचना जिल्हा परिषदेला केल्या. 

अस्वच्छता दूर झाली 
डोंगरगाव (शिव) निधोना केंद्रातील समीक्षा सूर्यवंशी हिने पत्रात म्हटले, ‘आम्ही घरी आणि शाळेत स्वच्छतागृहाचा वापर करतो. त्यामुळे आजार पसरत नाहीत. गावात डास होत नाहीत, गाव स्वच्छ राहतो. पावसाळ्यात आता बाहेर भिजत जावे लागत नाहीत. स्वच्छतागृहाच्या वापरामुळे आता आम्हाला शाळेला जाताना नाक दाबून जावे लागत नाही’. 

महिलांसाठी खूप गरजेचे
लहान मुलांना शिकविण्याची गरज नाही. कारण ते आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण करतात आणि त्यांची मते तयार करतात. स्वच्छतागृहाच्या बाबतीतही फुलंब्री तालुक्‍यातील शिरोडी बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या योगेश लहाने या विद्यार्थ्याने मत व्यक्‍त करताना पत्रातून ‘स्वच्छतागृह काळाची गरज’ असा पोस्टकार्ड निबंधच लिहिला आहे. ‘पैसे मिळतात म्हणून काहीजण स्वच्छतागृह बांधतात; पण स्वच्छतागृह बांधल्यावर त्याचा वापर करा, वापर केला तर आजार होणार नाहीत, असा सल्ला या छोट्या स्वच्छतादूताने मोठ्यांना दिला आहे. ‘महिलांसाठी स्वच्छतागृह बांधणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांना बाहेर जाण्यासाठी खूप त्रास होतो म्हणून स्वत:च्या घरी स्वच्छतागृह बांधलेच पाहिजे’, असे या विद्यार्थ्याने पत्रात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com