औरंगाबाद बाजार समिती सभापतींवर अविश्‍वास ठराव मंजूर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - मराठवाड्याचे लक्ष लागून राहिलेल्या औरंगाबाद कषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय औताडे यांच्याविरुद्धचा अविश्‍वास ठराव मंगळवारी (ता.२२) तेरा विरुद्ध शून्य मतांनी मंजूर झाला. विधनासभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईत भारतीय जनता पक्षाने विजायाचे पहिले पाऊल टाकले आहे. याबाबत ‘सकाळ’ने दिलेले वृत्त खरे ठरले आहे. या ठरावानंतर बाजार समितीत भाजपतर्फे जल्लोष करण्यात आला. 

औरंगाबाद - मराठवाड्याचे लक्ष लागून राहिलेल्या औरंगाबाद कषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय औताडे यांच्याविरुद्धचा अविश्‍वास ठराव मंगळवारी (ता.२२) तेरा विरुद्ध शून्य मतांनी मंजूर झाला. विधनासभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईत भारतीय जनता पक्षाने विजायाचे पहिले पाऊल टाकले आहे. याबाबत ‘सकाळ’ने दिलेले वृत्त खरे ठरले आहे. या ठरावानंतर बाजार समितीत भाजपतर्फे जल्लोष करण्यात आला. 

कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या औरंगाबाद बाजार समितीचे सभापती संजय औताडे यांच्याविरुद्ध ११ ऑगस्टला भारतीय जतना पक्षाने १२ संचालकांच्या सह्यानिशी अविश्‍वास ठराव दाखल केला होता.  त्यावर मतदान घेण्यासाठी मंगळवारी विशेष बैठक घेण्यात आली. उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, बाजार समितीचे सचिव विजय शिरसाठ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तेरा संचालक हजर होते. सर्वांनी हात उंचावून अविश्‍वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. अविश्‍वास मंजूर झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, गुलाल उधळून जल्लोष केला. बाजार समितीच्या नवीन सभापतींची निवड पुढील आठवड्यात होणार आहे.

सभापती औताडे यांच्यासह इतर पाच संचालक बैठकीस गैरहजर होते.       
दोन वर्षांपूर्वी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत झाली होती. एकेकाळी भाजपचे कार्यकर्ते असणाऱ्या औताडे यांनी अपक्ष म्हणून विजय मिळविला होता. सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसच्या गणेश दहिहंडे यांना फोडून सभापतिपदाची उमेदवारी दिली होती. औताडे आणि दहिहंडे यांना समसमान म्हणजे प्रत्येकी नऊ मते मिळाली होती. त्यामुळे सोडतीद्वारे औताडे यांची सभापतिपदी निवड झाली होती. तेव्हापासून बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू होते. राधाकिशन पठाडे, शिवाजी वाघ आणि बाबासाहेब मुदगल या काँग्रेसच्या तीन संचालकांना, तर देवीदास कीर्तीशाही या अपक्ष संचालकास फोडून भाजपने सभापती संजय औताडे यांच्याविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला होता. निवडणुकीत दगाफटका होऊ नये, यासाठी सर्व सदस्यांना हैदराबाद येथे सहलीवर पाठविण्यात आले होते. अपेक्षेप्रमाणे अविश्‍वास ठराव मंजूर झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

आता लक्ष सभापती निवडणुकीकडे
गेल्या बारा दिवसांपासून बाजार समितीमध्ये सभापती निवडणुकीमुळे वातावरण तापले होते. राधाकिशन पठाडे यांना सभापतिपद देण्याच्या आश्‍वासनावर भाजपाने काँग्रेसचे तीन संचालक फोडले. हमाल-मापाडी मतदारसंघातील संचालक कीर्तीशाही यांनाही आपल्या बाजूने आणण्यात आले. आता अविश्‍वास ठराव मंजूर करीत एक पाऊल पुढे टाकले आहे; मात्र खरी लढाई सभापतींच्या निवडणुकीत राहणार आहे; कारण पठाडे यांच्याबरोबर हरिभाऊ बागडे यांचे विश्‍वासू दमोदर नवपुते व गणेश दहिहंडे हे सभापतिपदाचे दावेदार आहेत. यामुळे सर्वांचे लक्ष सभापती निवडणुकीकडे लागले आहे. 

माजी आमदार डॉ. काळे यांची प्रतिष्ठा पणाला 
संजय औताडे यांच्यावर अविश्‍वास ठराव पारित करण्याची ही दुसरी वेळ आहे. मागच्या वेळीही तीन वर्षे सभापतिपद सांभाळले होते. त्यानंतर पुन्हा एकदा डॉ. कल्याण काळे यांच्यामुळे औताडे यांना संधी मिळाली होती. डॉ. काळे यांनी चाणक्षपणे औताडे यांना सभापती करून भाजपला मोठा हादरा दिला होता. आता पुन्हा डॉ. काळे काय जादू करतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे.