सायलीच्या हस्तकलेची विदेशी नागरिकांना भुरळ

सायलीच्या हस्तकलेची विदेशी नागरिकांना भुरळ

औरंगाबाद - माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात झपाट्याने बदल होत आहेत. या बदलाची पावले ओळखून आपली हस्तकला जगाच्या पाठीवर पोचावी, यासाठी येथील सायली पवार - काटे हिने यूट्यूब चॅनेल सुरू केले. या माध्यमातून तिचे घरगुती ग्रीटिंग सातासमुद्रापार पोचले असून, विदेशातील नागरिकांना त्यांनी भुरळ घातली आहे. अवघ्या वर्षभरातच तिच्या शंभर व्हिडिओंना ५४ लाख व्ह्युअर्स, तर ४२ हजार सबस्क्राइबर मिळालेत. 

एमआयटी महाविद्यालयातून मास्टर ऑफ इंजिनिअरिंग झालेली सायली सात वर्षांपूर्वी कुटुंबातील व्यक्‍तींच्या वाढदिवसासाठीच ग्रीटिंग तयार करीत असे. नामांकित कंपन्यांच्या ग्रीटिंगपेक्षाही तिने बनविलिले ग्रीटिंग हटके असल्याने प्रत्येकवेळी भरभरून कौतुक व्हायचे. ज्यांना-ज्यांना तिचे ग्रीटिंग कार्ड दिले जायचे, त्यांच्याकडून कौतुक ठरलेलेच. यातूनच तिला प्रोत्साहन मिळत गेले. आपली कला हजारो लोकांपर्यंत जायला हवी, यासाठी सायलीने ऑक्‍टोबर २०१६ मध्ये लव्ह फॉर क्राफ्ट नावाने यूट्यूब चॅनेल सुरू करीत ग्रीटिंगबद्दलचा व्हिडिओ अपलोड केला. त्यास अवघ्या काही दिवसांतच प्रचंड पसंती मिळाली. विशेष म्हणजे तो परदेशात अधिक बघितला गेला. त्यानंतर एकापाठोपाठ एक असे आजतागायत शंभर व्हिडिओ तिने आपल्या चॅनेलवर अपलोड केले असून, त्यास वर्षभरात ५४ लाखांहून अधिक व्ह्युअर्स मिळाले आहेत. त्यामध्ये भारतातील प्रेक्षक सर्वांत जास्त असून, त्यापाठोपाठ फिलिपाइन्स, इंडोनेशिया, पाकिस्तान, अमेरिका, बांग्लादेश इजिप्त, मलेशिया, व्हिएतनाम, थायलंड, श्रीलंका, मेक्‍सिको, सौदी अरेबिया, ब्राझील, जर्मनी अशा अनेक देशांतून या हस्तकलेस पसंती मिळाली. 

पहिला व्हिडिओ पाहून सायलीला मुंबईतून पहिली ऑर्डर मिळाली. वेगळेपण असलेल्या एका ग्रीटिंग कार्डपोटी दोन हजार रुपये मिळाले असल्याचे सायली सांगते. कुठल्याही यंत्राशिवाय केवळ रंगीत कागदाच्या साह्याने तयार केलेल्या ग्रीटिंग कार्डने आपल्याला वेगळी ओळख दिली असल्याची भावनाही ती व्यक्‍त करते. कलेच्या कौतुकाप्रमाणेच साध्या पद्धतीने तिने अभियंता अंजिक्‍य पवार यांच्याशी केलेला विवाहदेखील समाजाला दिशा देणारा ठरला. झगमगाटाला थारा न देता गरीब विद्यार्थ्यांना लाख रुपयांचे मोफत पुस्तके वाटप केली. येथील लेखक, उद्योजक डी. एस. काटे यांची ती कन्या आहे.

आजपर्यंत आपण परदेशी कंपन्यांचे ग्रीटिंग कार्ड पाहत आलो. त्याचे कौतुकही केले; मात्र आपल्या शहरात तयार केलेल्या या ग्रीटिंग कार्डला दूरवरून मागणी होतेय, ही बाब मनाला आणखी नवनिर्मितीकडे घेऊन जात आहे. त्यामुळे आपल्या कामाची जबाबदारी वाढली आहे. 
- सायली पवार.

सृजनशीलता असेल तरच लोकप्रियता
आपल्या कलेत सृजनशीलता असेल तरच यूट्यूब त्यास स्वीकारते. फोटो, व्हिडिओ यूट्यूबवर लोड होण्यापूर्वी तुम्ही कुणाची कॉपी तर केली नाही ना, याची ऑनलाइन चाचपणी होते. वेगळेपण वाटले तरच ते अपलोड होते किंवा तुम्ही दुसऱ्यांचे व्हिडिओ अपलोड केल्यास नंतर तुम्हाला बॅनही केले जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com