औरंगाबाद शहरात पावसाने हाहाकार!

औरंगाबाद शहरात पावसाने हाहाकार!

औरंगाबाद - सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. १३) सायंकाळी पावसाने धुमाकूळ घालत काही काळासाठी शहराला ब्रेक लावला. पावसाचा जोर एवढा होता, की शहरातील नाल्यांना पूर आल्याने बारा वॉर्डांतील वसाहतींमध्ये पाणी शिरले. यात एमआयटी महाविद्यालयासमोरील नाल्याला पूर आल्याने दोन दुचाकीस्वार वाहून गेला. यापैकी रात्री उशिरा एकाचा अग्निशमन विभागाने शोध लागला. दरम्यान, या पावसाने शहराची लाईफलाईन असलेला जालना रोडही तुंबला होता. महापालिकेचा नियंत्रण कक्ष पुन्हा एकदा कुचकामी ठरला. रात्री अनेक भागांत अंधार होता. सुमारे पावणेदोन तासांत कोसळलेल्या या पावसाची चिकलठाणा वेधशाळेत ५० मिमी एवढी नोंद झाली. 

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात काहीसा बरसलेला पाऊस दुसऱ्या आठवड्यात मात्र चांगलाच प्रकटला. मंगळवारी (ता. १२) शहरात सायंकाळी सूर्यास्ताला पावसाचे जोरदार आगमन झाले. पावणेदोन तासांच्या पावसाने शहरात दमदार बॅटिंग करत काही काळासाठी जनजीवन थांबविले होते. अनेक रस्ते अक्षरशः पाण्याखाली गेले होते. या रस्त्यांवर वाहणाऱ्या पाण्यामुळे खड्डे न दिसल्याने अनेक वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडाली. शहराच्या सखल भागांत पावसाच्या पाण्याने ठाण मांडल्याने अनेक वाहनधारकांची चांगलीच धांदल उडाली.

मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी
जालना रोडचा आकाशवाणी चौकातून सिडको बसस्टॅंडकडे येणारा रस्ता पावसाच्या पाण्याने अक्षरशः तुंबला होता. सेव्हन हिलचा उड्डाणपूल ओलांडून वाहनांच्या रांगा थेट सेंट फ्रान्सिस शाळेसमोर पोचल्या होत्या. रघुवीर मोटर्स ते रामा इंटरनॅशनलदरम्यानच्या रस्त्यावर सुमारे तीन फूट पाणी साचले होते. पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेल्या यंत्रणेची साफसफाई झालेली नसल्याने हे पाणी तुंबले असल्याने नागरिक चांगलेच संतापले होते. या पाण्यामुळे सेव्हन हिल ते सिडको चौकापर्यंत जाण्यासाठी सुमारे तीस मिनिटांचा अवधी लागला.

रस्त्यांवरून दुचाकी गायब 
पावसाचा जोर एवढा होता की वाहने चालवणे अवघड झाले होते. समोर चालणारी आणि येणारी वाहने स्पष्ट दिसत नव्हती. पाऊस सुरू असताना दुचाकी रस्त्यांवरून गायब होत्या. सखल भागात असलेला चेतक घोडा चौक चहुबाजूने आलेल्या पाण्यामुळे तलावासारखा भासत होता. या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक वाहनांमध्ये पाणी गेले.

शेकडो कुटुंबे रात्रभर अंधारात  
घरात पाणी शिरल्यानंतरही मदत करण्यासाठी कुणीही पोचले नसल्याने शेकडो कुटुंबांना रात्र अंधारात काढावी लागली. घरातील पाणी उपसण्यासाठी लहान मुले, मुली, वयोवृद्ध मदत करीत होते. वीजपुरवठा कधी सुरळीत होईल याची माहिती मिळत नव्हती. अन्नपाणी घेणेही अवघड झाले होते.

शहरात जोरदार पाऊस झाल्यामुळे अनेक भागांत घरात पाणी घुसल्याची माहिती मिळताच नागरिकांना मदत करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. अग्निशमन विभागाच्या गाड्या पाणी उपसण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मी सध्या मुंबईला असून, शहरात आल्यानंतर पाहणी करून नाले अडविणारे, रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल.
- डी. एम. मुगळीकर, आयुक्त

गारखेडा, विजयनगर, सातारा, देवळाई पाण्यात
मुसळधार पाऊस झाल्याने शहराच्या १२ वॉर्डांतील हजारो घरांत पाणी शिरले. गारखेडा भागातील विजयनगर, हिंदूराष्ट्र चौक, सूतगिरणी, भारतनगर, पहाडे कॉर्नर, मल्हारचौक, छत्रपतीनगर, शिवाजीनगर, पारिजात नगर, बी-सेक्‍टर, सातारा, देवळाई  परिसरातील छत्रपतीनगर, प्रथमेश नगरी, नाईकनगर, देवळाईरोड, मोदी टॉवर ते हिवाळे लॉन्स बीडबायपास, सुरेवाडी, नक्षत्रवाडी, कांचनवाडी, नाथपूरम, सातारागाव, पेशवेनगर, मुकुंदवाडी, संघर्षनगर, अंबिकानगर, बालाजीनगर, सिंधी कॉलनी, ज्ञानेश्वरनगर, श्रीकृष्णनगर या भागात पाणी तुंबल्याने सोसायट्यांमधील घरे, दुकाने पाण्यात गेली. काही वसाहतींना पावसाच्या पाण्याचा वेढा पडला. सिडको, हडको वसाहतीमधील सखल घरांत पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली. एमआयटी कॉलेजसमोरील नाल्यात दोन जण वाहून गेले. त्यापैकी एकास रात्री उशिरा शोधण्यात यश आले, असे सातारा पोलिसांनी सांगितले.

अग्निशमन विभागाचे खणखणले फोन 
पावसाचे पाणी वाढताच नागरिकांमध्ये खळबळ उडाली. अनेकांनी अग्निशामक दलास कॉल करून माहिती दिली. तब्बल २७ कॉल आल्याने पदमपुरा, सिडको, एमआयडीसीमधील अग्निशामक केंद्रातील वाहने मदतीला धावले. जवानांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने शेकडो कुटुंबाचे स्थलांतर केले. रात्री उशिरापर्यंत हे मदतकार्य सुरू होते. त्याचबरोबर रुग्णवाहिकाही मदतीसाठी धावल्या. अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने मदतकार्यात अडथळा आला.

गाड्या पळविल्या; महापालिका झोपेत 
पावसाने दाणादाण उडाली असतानाही प्रशासन मात्र झोपेत होते. नगरसेवकांनी रस्त्यावर धाव घेत अग्निशमन विभागाच्या गाड्या अक्षरक्षः पळवून नेल्या. तर दुसरीकडे वॉर्डातील कर्मचारी-अधिकारी फिरकले नाही. आपत्ती व्यवस्थापन विभाग कागदावरच असल्याचे दिसून आले. प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकाऱ्याचा फोनही काही काळ बंद होता.

सखल भागात पाणी साचल्याने धावपळ
जालना रोड पाण्याने तुंबला
महापालिकेची यंत्रणा कुचकामी
शेकडो कुटुंबांचे रात्रीतून स्थलांतर
महावितरणने िदले अंधाराचे ‘बक्षीस’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com