भारतात संघर्ष आणि एकोपा एकत्र नांदतो कसा?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - संघर्ष आणि एकोपा एकत्र नांदणे ही तशी अवघड गोष्ट आहे, तरीही भारतात अनेक वेळा विविध जातिधर्मांत संघर्ष होऊनही एकोपा कसा नांदतो?, असा प्रश्‍न अमेरिकेच्या प्राध्यापकाला पडला. त्यामुळे या प्राध्यापकाने औरंगाबाद शहराची निवड करून अभ्यास सुरू केला. तीस वर्षांपूर्वी शहराला भेट दिल्यानंतर जे जाणवले, त्यात आता काय बदल झाला, हे अभ्यासण्यासाठी त्यांनी सध्या औरंगाबादेत तळ ठोकला आहे.

थॉमस ब्लॉम हॅन्सन हे कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठात मानववंशशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांनी 1991-92 या काळात औरंगाबादला भेट दिली होती. त्या वेळी या भागात 1885 ते 1992 दरम्यान छोट्या-मोठ्या तब्बल 35 दंगली झाल्याची माहिती त्यांना मिळाली. दंगली आणि त्यानंतरचे होणारे "पॅचअप' हा कुतूहलाचा विषय असल्यानेच थॉमस यांनी औरंगाबादची निवड केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मदतीने त्यांनी या अभ्यासाला सुरवात केली आहे. या काळात ते सामाजिकशास्त्र विभागात अतिथी प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवणारही आहेत.

शहरात सहायक मार्गदर्शक निवडण्यासाठी त्यांनी सहा जणांची मुलाखत घेतली. त्यातून वैभव झाकडे यांची निवड केली. आता झाकडे यांच्या मदतीने हॅन्सन यांनी शहराच्या अभ्यासाला सुरवात केली आहे. प्रगती कॉलनीतील एका उर्दू शाळेला भेट देऊन अभ्यासाचे तंत्र जाणून घेत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याशिवाय एमआयएम, शिवसेना व काही दलित पक्ष-संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी त्यांनी घेतल्या.

अभ्यासासाठी सहा महिने ते औरंगाबादमध्ये राहणार आहेत. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठाला प्रबंध सादर करणार आहेत. त्यानंतर यावर एक पुस्तक प्रकाशित करणार असल्याचे त्यांनी "सकाळ'ला सांगितले. आपला राजकीय व्यवस्थेचा काहीही संबंध नाही; मात्र राजकारणाशिवाय येथे समाजकारण पूर्ण होत नाही, म्हणून राजकारण आणि समाजकारण समजून घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नेमका काय केला अभ्यास?
हॅन्सन यांनी औरंगाबाद शहराची 1960 पासूनची माहिती गोळा केली. शहराचे राजकारण, समाजकारण काय आहे, राजकारणाशी समाजकारणाची नाळ कशी जोडली गेली, शहरातील विविध राजकीय पक्षांची काय अवस्था आहे, कोणत्या पक्षाचे किती गट आहेत, त्याचा समाजावर काय परिणाम होतो, अशा विविध बाबींची माहिती त्यांच्याकडे आहे.

थॉमस ब्लॉम हॅन्सन यांनी शहराची प्रचंड माहिती गोळा केली आहे. स्थानिकांकडे नसेल एवढी माहिती त्यांच्याकडे आहे. सध्या ते येथील विविध जाती-धर्मांतील नागरिकांची भेट घेऊन अभ्यास करीत आहेत.
- वैभव झाकडे, इंग्रजीचे अभ्यासक