पोलिसांच्या सतर्कतेने उधळला ‘आयडीबीआय’ लुटण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

औरंगाबाद - जालना रस्त्यावरील आयडीबीआय बॅंक फोडण्याचा प्रयत्न बुधवारी (ता. २६) पहाटे झाला. या टोळीतील एका संशयिताला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली; तर त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास त्यांच्यासह एकूण पाच जणांनी बॅंक लुटीचा डाव आखून प्रयत्न केला; पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा डाव उधळला गेला. अमोल जनार्दन भालेराव (वय १९, रा. एन- आठ, सिडको) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. 

औरंगाबाद - जालना रस्त्यावरील आयडीबीआय बॅंक फोडण्याचा प्रयत्न बुधवारी (ता. २६) पहाटे झाला. या टोळीतील एका संशयिताला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली; तर त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास त्यांच्यासह एकूण पाच जणांनी बॅंक लुटीचा डाव आखून प्रयत्न केला; पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा डाव उधळला गेला. अमोल जनार्दन भालेराव (वय १९, रा. एन- आठ, सिडको) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. 

बुधवारी पहाटे पुंडलिकनगर पोलिस ठाण्यातील कर्मचारी उपनिरीक्षक रामचंद्र पवार, शिपाई शेख अतार, यदमल, जालिंदर मांटे, संतोष पारधे, विलास डोईफोडे व रणजित सुलाने हे गस्तीवर होते. त्या वेळी ‘अभिनंदन हॉटेल’मधून चौघेजण बाहेर निघताना त्यांना दिसले. पोलिस त्यांच्याजवळ येत असल्याने त्यांनी पोबारा केला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केल्यानंतर भालेराव त्यांच्या हाती लागला. पोलिसांनी भालेरावला पकडून त्याची चौकशी केली. त्याच्याजवळील बॅग जप्त करून तपासणी केली. त्या वेळी बॅगेत विविध प्रकारची शस्त्रे सापडली. पोलिसी खाक्‍या दाखविताच त्याने बॅंक फोडण्याचा कट रचल्याची कबुली दिली; तसेच सोबत असलेल्या साथीदारांचीही त्याने माहिती दिली. यात उत्तराखंडस्थित; तसेच भोकरदन, मुकुंदवाडी, राजनगर येथील टोळीच्या सदस्यांची माहिती दिली. त्यानुसार, पोलिसांनी ‘हॉटेल अमरप्रीत’मधील अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. कट रचून दरोड्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली संशयितांविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. तपास उपनिरीक्षक रामचंद्र पवार करीत आहेत.

बॅंकेत होते चार कोटी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयडीबीआय बॅंकेत रोज चार कोटींची रक्कम ठेवली जाते. या बॅंकेत मोठी रक्कम असावी, असा टोळीचा अंदाज होता. त्यामुळे त्यांनी दोन महिन्यांत चारवेळा बॅंकेची रेकी केली होती. पहाटे भालेरावला पकडल्यानंतर त्याच्याकडून मास्क, गुंगीचे औषध, पैसे भरण्यासाठी गोणीसुद्धा पोलिसांना सापडली.

असाही खटाटोप
हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील स्टाफरूममध्ये झोपणारे तिघे संशयित तरुण हॉटेलवर लावलेल्या होर्डिंग्जचा आधार घेऊन अँगलद्वारे खाली उतरत होते. होर्डिंगमुळे बहुदा दिसणेही दुरापास्त होते; तर भालेराव सायकलने सिडकोतून हॉटेलजवळ यायचा. यानंतर चौघे मिळून बाहेर जाऊन चोरी व अन्य कारनामे करीत असल्याचे समोर आले आहे.

स्वयंपाकी, वेटरचा कारनामा
जालना रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये चार वेटर कामाला असून, त्यात एक अल्पवयीन मुलगा स्वयंपाकी दुसऱ्या एका मोठ्या हॉटेलमध्ये कामाला आहे. पाचजण मिळून ते गत काही दिवसांत बॅग लिफ्टिंग व चोऱ्या करीत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

रेकीही झाली
आयडीबीआय बॅंकेजवळच एक मोठी हॉटेल आहे. या हॉटेलमध्येच काम करणाऱ्या संशयिताच्या टोळीने आयडीबीआय बॅंकेची चार वेळा रेकी केली. ही बॅंक फोडून झटपट श्रीमंत होण्याचा त्यांचा मानस होता. लुटीसाठी त्यांनी हॉटेलमध्येच चाकू, हातोडा, कटर, स्क्रू ड्रायव्हर, छिन्नी अशी तब्बल बारा हत्यारे जमविल्याचे चौकशीतून समोर आले.