परिसरातील गावांमध्ये जमिनींची कोटींची उड्डाणे

शेखलाल शेख
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - शहराच्या दहा किलोमीटरच्या आत असलेल्या गावांमध्ये गृहप्रकल्प उभे राहत असल्यामुळे मुख्य रस्त्यांलगत असलेली जमीन एक ते दोन कोटी रुपये प्रतिएकरच्या घरात गेली आहे. त्यामुळे घरे, प्लॉट, सदनिका यांच्या किमतीही वाढल्या आहेत.

औरंगाबाद - शहराच्या दहा किलोमीटरच्या आत असलेल्या गावांमध्ये गृहप्रकल्प उभे राहत असल्यामुळे मुख्य रस्त्यांलगत असलेली जमीन एक ते दोन कोटी रुपये प्रतिएकरच्या घरात गेली आहे. त्यामुळे घरे, प्लॉट, सदनिका यांच्या किमतीही वाढल्या आहेत.

शहरात घर किंवा प्लॉट घेणे मध्यवर्गीयांच्या आवाक्‍याबाहेर गेले आहे. त्यामुळे अनेकांनी शहरालगतच्या गावांमध्ये आपल्या ‘ड्रीम होम’चा शोध सुरू केला आहे. परिसरातील गावांचा ग्रामपंचायतींच्या माध्यमातूनही विकासही होत असल्याने; तसेच तेथे चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत; पण शहराच्या परिसरातील जमिनी आता कृषीऐवजी गृहप्रकल्प, प्लॉटिंगमध्ये जात आहेत. मुख्य रस्त्यांच्या कडेला असलेल्या जमिनीत अनेकांनी गुंतवणूक करीत त्यांना तार कंपाउंड केले आहे. 

शहरापेक्षा गावांकडे कल
औरंगाबाद शहरात आता मोजक्‍याच ठिकाणी प्लॉट शिल्लक आहेत. त्याच प्लॉट, घरांची खरेदी-विक्री किंवा त्यावर एकापेक्षा जास्त मजली बांधकामे सुरू आहेत; मात्र हे प्लॉट, घरे, बंगले खरेदी करणे अनेकांच्या आवाक्‍याबाहेर आहे. त्यामुळे अनेक जण राहण्यासाठी आता ग्रामपंचायतींच्या हद्दीला पसंती देत असल्याने जवळच्या गावांमध्ये मोठमोठे गृहप्रकल्प, प्लॉटिंग होत आहेत. शहरापेक्षा ग्रामपंचायतींच्या हद्दीत घरे, प्लॉटच्या किमती काहीशा कमी आहेत. शिवाय एकाच गृहप्रकल्पात अनेक सुविधा दिल्या जात असल्याने अनेकांच्या ओढा ग्रामपंचायतींच्या हद्दीकडे येताना दिसतोय. काही जण भविष्यातील गुंतवणूक म्हणून खरेदी करीत आहेत. ‘डीएमआयसी’चा विस्तारानेही शहराच्या लगतच्या जमिनीचे भाव वधारले आहेत. 

या गावांत वधारले भाव
केंब्रिज ते सावंगी रिंग रोडमुळे पिसादेवी, गोपाळपूर, पोखरी, सावंगी गावातील जमिनीला कोट्यवधींचा दर मिळत आहे. या रोडपासून लांब असलेल्या जमिनीलासुद्धा लाखोंच्या घरात दर मिळतोय. सध्या सावंगी, नायगाव, पिसादेवी, पोखरी, मांडकी, गोपाळपूर, शेंद्रा, कुंभेफळ, करमाड, सुंदरवाडी, झाल्टा, बाळापूर, गांधेली परिसरात गृहप्रकल्प उभे राहत असल्याने येथील जमिनीला चांगले दर आहेत. 

शेतीऐवजी प्लॉटिंग
शहराच्या परिसतील जमिनीत भाजीपाल्याची शेती जास्त केली जाते; मात्र शहराचे क्षेत्र वाढत असल्याने जमिनीवर शेतीऐवजी प्लॉटिंग झालेली आहे. कित्येक जमिनींवर मोठे गृहप्रकल्प तयार झालेले दिसतात. काही जमिनी गृहप्रकल्पांसाठी खरेदी करण्यात आलेल्या आहेत.

‘समृद्धी’चाही परिणाम
वरूड काजी, कच्चेघाटी, पळशी शहर, पोखरी, नायगाव भागातून समृद्धी महामार्ग जाणार असल्याने येथील जमिनीचे दर आणखी जास्त वाढतील असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे येथील जमिनींवर प्रत्येक महिन्याला कुठे ना कुठे प्लॉटिंग, गृहप्रकल्पांची आखणी होताना दिसते.

Web Title: aurangabad marathwada news land rate growth