दीडशे कोटींच्या रस्त्यांसाठी महापौरांची प्रतिष्ठा पणाला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

औरंगाबाद - शहरातील रस्ते खड्डेमुक्त व्हावेत, शहराची प्रतिमा उजळविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. शहरातील रस्त्यांची कामे करण्यासाठी शासनाकडे पालिकेने 150 कोटींची मागणी केली असून, मागील वर्षभरापासून महापौर तसेच पालिका प्रशासन यासाठी शासन दरबारी खेट्या मारत आहे; मात्र अद्याप निधी मंजूर झालेला नाही. आपल्याच कार्यकाळात हा निधी मंजूर होऊन कामे सुरू व्हावीत, यासाठी महापौर घडामोडे यांचे प्रयत्न सुरू आहेत. महापौरपदाचे केवळ पाच महिने शिल्लक असून, निधी प्राप्त करून घेण्यासाठी त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

सेना-भाजप युतीत झालेल्या बोलणीनुसार एका वर्षासाठी भाजपकडे महापौरपद देण्यात आले आहे. बापू घडामोडे यांनी महापौरपदी विराजमान होताच आपल्या कार्यकाळात 150 कोटींचा निधी आणून शहरातील रस्ते चकचकीत करणार असल्याची घोषणा केली होती. तसेच रस्ते सुधारल्याशिवाय जाहीर नागरी सत्कार स्वीकारणार नाही, असाही संकल्प त्यांनी या वेळी सोडला होता. त्यांच्या कार्यकाळातील सात महिने उलटले असून, आता केवळ पाच महिने म्हणजेच 150 दिवस उरले आहेत. या दिवसांत तरी भाजपच्या महापौरांना राज्य शासनाकडून 150 कोटींचा निधी पदरात पाडून घेण्यात यश येईल का, असा प्रश्‍न पालिकेच्या राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.

दीडशे कोटींतून शहरातील सुमारे 45 रस्त्यांची विकासकामे करण्याचे प्रस्तावित आहे. त्यांची यादीही अंतिम करून ती शासनाकडे पाठविण्यात आली आहे. याविषयी महापौर घडामोडे यांनी सांगितले की, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव यांच्याकडे हा प्रस्ताव गेलेला आहे. लवकरच तो मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे. मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाली की निधी मंजूर होईल. तथापि, शहराला रस्ते कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन 2016 मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिले आहे.