'मिनी घाटी’ पाच महिन्यांत कार्यान्वित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

औरंगाबाद - ‘‘येत्या दोन महिन्यांत चिकलठाणा येथील ‘मिनी घाटी’चे उद्‌घाटन करण्याचे नियोजन असून, त्यानंतर महिनाभरात बाह्यरुग्ण तपासणी सुरू करण्यात येईल. हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊन सेवा देण्यास साधारण पाच महिने लागतील,’’ अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी बुधवारी (ता. १९) पत्रकारांशी बोलताना दिली. 

औरंगाबाद - ‘‘येत्या दोन महिन्यांत चिकलठाणा येथील ‘मिनी घाटी’चे उद्‌घाटन करण्याचे नियोजन असून, त्यानंतर महिनाभरात बाह्यरुग्ण तपासणी सुरू करण्यात येईल. हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊन सेवा देण्यास साधारण पाच महिने लागतील,’’ अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी बुधवारी (ता. १९) पत्रकारांशी बोलताना दिली. 

ते म्हणाले, ‘‘शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात (घाटी) मराठवाड्याच्या विविध भागांतून दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. घाटी रुग्णालयावरील रुग्णसेवेचा ताण कमी करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय सुरू करण्याचे ठरले होते. त्यानुसार दोनशे खाटांचे हे रुग्णालय उभारण्यात आले आहे. तळमजल्यावर वाहनतळ, औषधालय, रुग्णावाहिका गॅरेज, कार्यशाळा, अग्निशमन खोली, विद्युत खोली, स्वच्छतागृह राहील. पहिल्या मजल्यावर नोंदणी व प्रतीक्षागृह, सर्व बाह्यरुग्ण विभाग, अपघात-आपत्कालीन कक्ष, प्रयोगशाळा, क्ष-किरण, सोनेग्राफी, सिटी स्कॅन, प्रशासकीय विभाग, दुसऱ्या मजल्यावर रक्तपेढी, प्रसूतिगृह, एसएनसीयू, स्वयंपाकगृह, शस्त्रक्रिया विभाग, अतिदक्षता विभाग, कैद्यांचा वॉर्ड, स्त्री-पुरुष संसर्गजन्य रोग विभाग, औषध वैद्यकशास्त्र विभाग, एएनसी, पीएनसीचे नियोजन आहे. तिसऱ्या मजल्यावर शल्यचिकित्सा कक्ष, शुश्रूषा कक्ष, स्त्री रोगतज्ज्ञ कक्ष, ट्रॉमा कक्ष, अस्थिरोग विभाग, मुलांचा विभाग, नेत्ररोग विभाग, मानसोपचार विभाग, जळीत विभाग उभारण्यात आले आहे.’’ 

वर्ष २०१५ मध्ये हे रुग्णांसाठी खुले करण्यात येणार होते. प्रत्यक्षात दोन वर्षे उलटूनही उद्‌घाटन न झाल्याबद्दल छेडले असता साधारण दोन महिन्यांनंतर उद्‌घाटन करण्यात येणार असल्याचे डॉ. शिनगारे यांनी स्पष्ट केले. या वेळी उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर चौधरी, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड आदी उपस्थित होते.

आयर्नच्या गोळ्यांचा तुटवडा
आयर्नच्या गोळ्यांच्या तुटवड्याबाबत डॉ. शिनगारे म्हणाले, ‘‘थॅलेसेमियाच्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या आयर्नच्या गोळ्या बनविणाऱ्या कंपनीने उत्पादन बंद केले आहे. त्यामुळे संपूर्ण देशातच टंचाई निर्माण झाली आहे. परदेशातील कंपन्यांकडे मागणी केली; परंतु त्यांच्याकडेही तुटवडा आहे. त्यामुळे पर्यायी गोळ्या देत आहोत. ‘घाटी’त थॉयरॉईडच्या तपासणीसाठी आवश्‍यक असलेल्या किटचा स्टॉक ठेवण्याची सूचना केली आहे.