आयुक्तांनी महापालिकेचा केला प्रयोगशाळेसारखा वापर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

महापौरांची टीका; मुगळीकरांच्या अनुपस्थितीमुळे सर्वसाधारण सभा तहकूब

महापौरांची टीका; मुगळीकरांच्या अनुपस्थितीमुळे सर्वसाधारण सभा तहकूब
औरंगाबाद - प्रत्येक आयुक्ताने महापालिकेचा वापर प्रयोगशाळा म्हणूनच केला. आपल्या मनाप्रमाणेच कारभार केला. आपल्याला महापालिकेची प्रयोगशाळा होऊ द्यायची नाही, एकमताने निर्णय घेऊन सभा सक्षम असल्याचे दाखवून दिले पाहिजे, असे मत व्यक्त करीत महापौर बापू घडमोडे यांनी महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्या गैरहजेरीमुळे मंगळवारी (ता.20) सर्वसाधारण सभा तहकूब केली.

महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता कधी नव्हे ती वेळेवर सुरू झाली. या वेळी दहावीच्या परीक्षेत महापालिका शाळेतून पहिला क्रमांक मिळविलेल्या नारेगावच्या शाळेतील महेंद्र माणिक मोरे या विद्यार्थ्याचे, मुख्याध्यापक व शाळेतील शिक्षक; तसेच शाळा दत्तक घेणाऱ्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. यानंतर सभागृहनेते गजानन मनगटे यांनी आयुक्त मुगळीकर सर्वसाधारण सभेला उपस्थित नसल्याबद्दल सभा तहकूब करण्यात यावी, असा प्रस्ताव मांडला. त्यास अफसर खान, गंगाधर ढगे, नासेर सिद्दिकी, नंदकुमार घोडेले, प्रमोद राठोड यांनी अनुमोदन देत सभा तहकूब करण्याची विनंती केली.

नंदकुमार घोडेले यांनी या वेळी बदली झालेल्या कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती पुढच्या सर्वसाधारण सभेत सादर करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची विनंती केली. तत्कालीन आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी आपल्या कार्यकाळात विविध विभागांतील कर्मचाऱ्यांच्या अनपेक्षित विभागात बदल्या केल्या. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांअभावी त्यांच्या मूळ विभागातील कामे खोळंबली आहेत. तर बदली झालेल्या विभागाची कामे या कर्मचाऱ्यांना काम येत नाही. यामुळे कामे ठप्प असून, अशा कर्मचाऱ्यांची सभेच्या पटलावर माहिती ठेवण्यात यावी, सभेत त्यावर चर्चा करता येईल, असे घोडेले यांचे म्हणणे होते. आपल्या अधिकारातील बदल्या रद्द करण्याचे काम करण्याऐवजी आयुक्त राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागवीत असल्याचेही समजते, असे घोडेले म्हणाले. त्यांच्या या विनंतीची दखल घेत पुढच्या सभेत ही माहिती सादर करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. त्यानंतर त्यांनी सभा तहकूब केली.