शहराला गतवैभव प्राप्त करून देणार - नंदकुमार घोडेले

शहराला गतवैभव प्राप्त करून देणार - नंदकुमार घोडेले

औरंगाबाद - राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराची खड्डे, अस्वच्छता, पाणीटंचाई, दुभाजकांची दुरवस्था, विद्रूप चौक यामुळे मोठी बदनामी झाली आहे. आगामी काळात महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनतेच्या सहकार्यातून शहराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी दिवसाचे अठरा तास काम करण्याचा निर्धार नवनिर्वाचित महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केला. शहराचे सिंगापूर किंवा लंडन करावे, अशी नाही तर महापालिकेच्या कारभाराला शिस्त लागावी, दैनंदिन अडचणी दूर व्हाव्यात एवढीच जनतेला अपेक्षा आहे, माझ्याकडेही जादूची कांडी नाही मात्र छडी हातात घेऊन काम करावे लागणार आहे, असेही महापौरांनी सांगितले. 

‘कॉपी विथ सकाळ’मध्ये श्री. घोडेले बोलत होते. औरंगाबाद हे वेरूळ, अजिंठा लेण्यांमुळे जागतिक स्तरावर महत्त्वाचे शहर मानले जाते. केंद्र, राज्य सरकारचेदेखील या शहरावर विशेष लक्ष असून, गेल्या काही वर्षांपासून मात्र शहराला बदनामीला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे महापालिकेवर सर्वच स्तरातून टीका झाली. आता चित्र बदलत आहे. गेल्या काही दिवसांत दहा-वीस टक्के रस्त्यांची कामे झाली. त्यात राज्य शासनाने शंभर कोटी रुपयांचा निधी दिला आहे. महापालिकादेखील ५० कोटींची कामे करणार आहे. येणाऱ्या काळात दीडशे कोटीतून ५२ रस्त्यांची कामे होणार असून, नागरिकांना दिलासा मिळेल. पदभार घेतल्यानंतर शहरातील सर्वच रस्त्यांचे डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. सुमारे ७०० कोटी रुपयांचा निधी रस्त्यांसाठी लागण्याची शक्‍यता आहे. राज्य शासनाने आणखी शंभर कोटीचा निधी देण्याचे आश्‍वासन दिले आहे. उर्वरित निधी कसा उभा करायचा यावर धोरणात्मक निर्णय घेऊन, ज्या रस्त्यांना अद्याप डांबरही लागले नाही, अशादेखील रस्त्यांची कामे करण्यात येतील. रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत यासाठी महापालिकेचा क्वालिटी कंट्रोल विभाग असावा, दक्षतापथक स्थापन करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले.

महापौर श्री. घोडेले म्हणाले, की जो येतो तो महापालिकेवर तोंडसुख घेतो, महापालिकेत काहीच होऊ शकत नाही, असा नागरिकांचा समज झाला आहे. तो बदलण्यासाठी येणाऱ्या काळात काम करावे लागणार आहे. शहरातील दुभाजकांचे सुशोभीकरण करण्यासाठी अनेक संस्था नागरिकांनी पुढाकार घेतला होता. मात्र दोन वर्षांपासून प्रशासनाने त्यांच्यासोबत करार केला नाही. एखाद्याला चकरा मारायला लावणे, ही अधिकाऱ्यांची मानसिकता आहे. त्यातही बदल करण्याचे काम करावे लागणार आहे.

तीस टन वाढला कचरा, शहर झाले स्वच्छ  
शहरातील साफसफाई महत्त्वाची आहे. मात्र स्वच्छता कर्मचारी झोकून देऊन काम करत नसल्याने या विभागाला मरगळ आली होती. पदभार घेतल्यानंतर पहिल्याच दिवसापासून पहाटे पाच ते सात शहरभर फिरून पाहणी केली. कर्मचारी, वाहनचालक वेळेवर न येणे, केवळ तास-दोन तास काम करून गायब होणे, काहींची नेतेगिरी असे प्रकार सुरू होते. त्याचा संपूर्ण शहराच्या कामावर परिणाम होत होता. सुरवातीला अशा कर्मचाऱ्यांना तंबी देण्यात आली. त्यानंतर कारवाईचा इशारा देण्यात आला. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना धाक बसला असून, मांडकी (नारेगाव) येथे जाणाऱ्या कचऱ्यामध्ये तीस टनाने वाढ झाली आहे, तर दुसरीकडे शहर स्वच्छ दिसत असल्याचा दावा महापौरांनी केला.
 

तारेवरची कसरत
पदभार घेतल्यापासून कामाचा धडाका सुरू केला असला, तरी महापालिकेतील मर्यादा माहीत आहेत. उत्पन्न कमी, खर्च अफाट हे सध्याचे चित्र आहे. अद्याप शहरातील ७० टक्के मालमत्तांना कर लागलेला नाही. ज्यांना कर आकारणी केली आहे, त्यात कर भरणाऱ्यांचे प्रमाणदेखील अत्यल्प आहे. त्यामुळे उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठीदेखील काम करावे लागणार आहे. 

सुरू होणार शहर बस 
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद शहराचा समावेश झाला. त्यासाठी निधीदेखील मिळाला असून, त्यातून येणाऱ्या काळात शहरबस सुरू करण्यात येणार आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी २३ जानेवारीला शहरबस नागरिकांच्या भेटीला येईल. ३० बसने सुरवात होणार असून, हळूहळू ही संख्या शंभरपर्यंत नेण्याचा मानस असल्याचे श्री. घोडेले यांनी सांगितले. 

दुजाभाव नाही
आगामी काळात लोकसभा, विधानसभा निवडणुका होणार असून, त्यात शिवसेनेला फायदा होईल, यासाठीच कामे होतील का? या प्रश्‍नाला उत्तर देताना श्री. घोडले म्हणाले, ‘‘हा महापौर युतीचा आहे. भाजप नगरसेवकांनीदेखील मला निवडून देण्यासाठी मतदान केले आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या संघर्षात मी पडणार नाही. दुजाभाव केला जाणार नाही’’.

...तर समांतरचा विचार
शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, नागरिकांचा मोठा रोष आहे. महापालिका सध्या १५० एमएलडी पाणी नाथसागरातून उचलते. मात्र शहरात केवळ १२५ एमएलडी पाण्याचे वितरण केले जाते. २५ एमएलडी पाणी जाते कुठे, याचा शोध घ्यावा लागेल. समांतर पाणीपुरवठा योजना झाल्याशिवाय परिस्थिती पूर्वपदावर येणार नाही, असे अधिकारी सांगतात. मात्र ‘समांतर’ पुन्हा आणायची असेल तर करारात सुधारणा झाली पाहिजे. नागरिकांचे हित होणार असेल तरच त्याचा विचार करण्यात येईल. 

जनजागृती
प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला नोटीस बजावली आहे. याबाबत विचारणा केली असता, आगामी काळात शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेला काय करावे लागेल, यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येईल.

महापौरांचे संकल्प
  स्मार्ट सिटी प्रकल्पात वॉररूम तयार करणे.
  मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटल, रक्तपेढी सुरू करणे.
  ‘बीओटी’ची कामे पूर्ण करून घेणे.
  महापालिकेतील लालफीतशाही कारभार थांबविणे.
  महिलांसाठी स्वच्छतागृह बांधणे.
  सातारा-देवळाई परिसराचा विकास.
  मांडकी (नारेगाव) येथील डेपोतील जमा कचऱ्याची विल्हेवाट लावणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com