कारवाई झालीच नाही; आयुक्त मुंबईला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

औरंगाबाद - शिवसेना विकासाच्या आड कधीच येणार नाही; परंतु अनधिकृत धार्मिक स्थळांच्या यादीतील अनेक स्थळे ही खासगी जागेत आहेत. त्यामुळे अशा प्रकारची धार्मिक स्थळे हटविण्यास शिवसेनेचा विरोध आहे. सरसकट अनधिकृत ठरवून धार्मिक स्थळ हटाव प्रकरणाला शिवसेनेचा विरोध आहे. रक्त सांडले तरी चालेल; पण शिवसेना हे सहन करणार नाही, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी दिला. दरम्यान, आयुक्‍त मुंबईला गेल्याने बुधवारपासून (ता. २६) कारवाईला सुरवात होऊ शकली नाही. 

महानगरपालिकेत महापौरांच्या दालनात बुधवारी (ता. २६) महापालिकेच्या अधिकाऱ्यांची शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बैठक घेऊन चर्चा केली. उपमहापौर स्मिता घोगरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, राजू वैद्य, संतोष जेजूरकर, अनिल पोलकर, शहराध्यक्ष बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, गोपाळ कुलकर्णी, सुशील खेडकर, गटनेते मकरंद कुलकर्णी, अनिल पोलकर, सचिन खैरे, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपायुक्त रवींद्र निकम, विधी सल्लागार अपर्णा थेटे व वॉर्ड अधिकारी उपस्थित होते. या वेळी श्री. दानवे म्हणाले, ‘‘कारवाईला आमचा विरोध नाही. मात्र, महापालिकेने चुकीची यादी दिली. खासगी व आरक्षित जागेवरील धार्मिक स्थळे कशी काढता येतील? रस्त्याला बाधित असलेल्या धार्मिक स्थळांबाबत चर्चेतून मार्ग काढण्यास आम्हीही तयार आहोत; पण सरसकट धार्मिक स्थळे काढता येणार नाहीत, त्याला शिवसेनेचा विरोधच राहणार आहे.

महापौरही मुंबईत
न्यायालयाच्या आदेशानंतर सर्व विभागांची बैठक महापालिकास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी मंगळवारी (ता.२५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथे घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधात बुधवारपासून (ता. २६) कारवाई सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, बुधवारी प्रशासकीय कामानिमित्त आयुक्त मुगळीकर मुंबईला गेले. त्यामुळे बुधवारी कारवाईला सुरवात झाली नाही. विशेष म्हणजे महापौर भगवान घडामोडे हेदेखील आधीच मुंबईला गेले आहेत. आयुक्त, महापौर कोणत्या कामासाठी मुंबईला गेले, याची दिवसभर महापालिकेत चर्चा सुरू होती.