विमानतळावर रंगल्या निराधार मुलांशी गप्पा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

औरंगाबाद - राज्यातील निराधार मुलांना खुल्या प्रवर्गातून एक टक्का समांतर आरक्षण देण्याचा महत्‌तवपूर्ण निर्णय शासनाने घेतला. याबद्दल महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी निराश्रित मुला-मुलींनी पहाटेच्या कडाक्‍याच्या थंडीतही विमानतळावर हजेरी लावली. गुलाबाची फुले देऊन त्यांनी पंकजा मुंडे यांचे स्वागत करून आभार मानले. या मुलांचे प्रेम पाहून पंकजा मुंडे यांचे डोळे पाणावले.

निराधारगृहातील कालावधी संपल्यानंतर जगात वावरताना निराधार मुला-मुलींची प्रचंड घुसमट होते. विशेषतः त्यांचा प्रवर्ग निश्‍चित नसल्याने त्यांना शैक्षणिक, आर्थिक, समाजिक सवलतींपासून वंचित राहावे लागते. या अडचणी लक्षात घेऊन त्यांना खुल्या प्रवर्गातून एक टक्‍का समांतर आरक्षण देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. दरम्यान, मुंबईहून बीडला जाण्यापूर्वी पंकजा मुंडे रविवारी (ता. 21) सकाळी सहा वाजता येथील विमानतळावर आल्या होत्या. एक टक्का आरक्षण देण्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी शहरातील निराधारगृहात वाढणारी मुले-मुली पहाटेपासूनच चिकलठाणा विमानतळावर हातात गुलाबाची फुले घेऊन पंकजा मुंडे यांची वाट पाहात होती. सकाळी साडेसहाच्या सुमारास पंकजा मुंडे यांचे विमान आले आणि काही मिनिटांतच त्या विमातळाबाहेर आल्या. निराधार मुले स्वागतासाठी विमानतळावर आल्याचे पाहून त्या भारावून गेल्या.

मुलांनी गराडा टाकताच प्रत्येकाशी पंकजा मुंडे यांनी आपुलकीने संवाद साधला. मुलांनी दिलेली गुलाबाची फुले घेताना पंकजा मुंडे यांचे डोळे पाणावले होते.

आमचे प्रश्‍न सुटतील
विद्यार्थ्यांनी "अनाथांना दिला आधार, ताई तुमचे खूप आभार', अनाथांची आई पंकजाताई अशा घोषणा द्यायला सुरवात केली. आपल्या स्वागतासाठी थंडीची तमा न बाळगता ही मुले भल्या पहाटेपासून विमानतळावर आली असल्याची जाणीव पंकजा मुंडे यांना झाली होती. त्यामुळे सगळ्या मुलांना विमानतळातील उपाहारगृहात नेऊन त्यांच्यासाठी चहा, दुधाची व्यवस्था केली. चहा घेता घेताच त्यांच्या मुला-मुलींशी गप्पा रंगल्या. अनेक मुलांनी त्यांना कविता, गाणी म्हणून दाखविली, तर काहींनी "ताई, तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळे आमच्या भविष्याचे प्रश्‍न सुटतील', असे म्हणत आनंद व्यक्त केला.

Web Title: aurangabad marathwada news pankaja munde chat with baseless child