"कागद उद्योगात आव्हानातच संधी'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - 'कागद उद्योगासमोर आज मोठी आव्हाने उभी आहेत; परंतु या आव्हानांमध्येच खूप संधीही दडलेल्या आहेत. या संधीचा लाभ घेण्यासाठी कागद उद्योगाने स्वतःमध्ये काळानुरूप बदल घडविणे आवश्‍यक आहे. उत्कृष्ट दर्जा, स्पर्धात्मक किंमत आणि तत्पर सेवा या त्रिसूत्रीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन कागद उद्योग जागतिक आव्हानांचा सामना सहज करू शकतो. मात्र, प्रगतीबरोबरच पर्यावरणाचे संरक्षण हेदेखील आपले कर्तव्य आहे'', असे प्रतिपादन उद्योगपती, नंदकिशोर कागलीवाल यांनी केले.

महाराष्ट्र पेपर मिल्स असोसिएशनतर्फे आयोजित इंडियन पल्प अँड पेपर टेक्‍निकल असोसिएशनच्या (इप्टा) दोन दिवसांच्या विभागीय परिषदेला शुक्रवारी प्रारंभ झाला. परिषदेमध्ये देशभरातून अडीचशेवर प्रतिनिधी सहभागी झालेले असून, त्यांना मार्गदर्शनासाठी देशविदेशातून तज्ज्ञ आले आहेत.