शांतता समितीची बैठक ‘खड्ड्यात’!

शांतता समितीची बैठक ‘खड्ड्यात’!

औरंगाबाद - गणेशोत्सवासोबत विविध धार्मिक उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्तालयातर्फे घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत उपायांऐवजी शहरातील रस्ते व खड्ड्यांवरच जास्त चर्चा झाली. यावरुन नागरिकांनी सपशेल नाराजी व्यक्त केली. तर चक्क लोकप्रतिनिधींनीही यात उडी घेत आजही शहरात खड्डे आहेत, पॅचवर्क करा, ही बाब म्हणावी लागते, अशी खंत व्यक्त केली. विशेषत: रस्त्यांसाठी आलेल्या शंभर कोटींच्या निधीवरुनही चांगलाच कलगीतुरा रंगला. त्यामुळे शांतता बैठकीचा मूळ मुद्दा बाजूला राहून बैठक मात्र ‘खड्ड्यातच’ अडकून राहिली.

उत्सव, जयंतीवेळीच खड्डे व त्यावरील उपायांबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी जागरूक होतात, बैठका घेतात. पण वर्षभर आवाज उठवूनही काहीच हालचाली नसतात, असा रोष बैठकीत नागरिकांनी व्यक्त केला. यावर महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी पॅचवर्कची कामे तत्काळ सुरु केली आहेत. लाईटचे प्रश्‍न सोडवण्याचे प्रयत्न करु, असे सांगून बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे महावितरणचे अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल यांनी वीजपुरवठा अखंड ठेवू व अत्यल्प दरात वीज उपलब्ध करुन दिली असल्याचे सांगितले. धर्मादाय आयुक्तांनी सव्वाचारशे गणेश मंडळांना परवानगी दिल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी स्वच्छता ठेवावी, अफवांना बळी न पडता सोशल मीडियावरील चुकीच्या संदेशांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला.  माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांनी महिलांची छेड होणार नाही याची काळजी घ्यावी, असा सल्ला गणेश मंडळांना दिला. पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी सामुदायिक पोलिसिंगसाठी वचनबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी रस्ते, पॅचवर्क व खड्ड्यांवरुन लोकप्रतिनिधींनी बैठकीत चांगलाच खल केला. आपापले मुद्दे समोर करुन त्यांनी एकमेकांवर राजकीय कुरघोडी केली.  यावेळी गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उपमहापौर स्मिता घोगरे आदींसह राजकीय नेते, लोकप्रतिनिधी पोलिस अधिकारी उपस्थित होते. 

दंगल करणारे समोर अन..स्टेजवरही..!
‘‘दंगल करणारे काही समोर बसले तर काही मंचावर बसले,’’ असे गंभीर वक्तव्य करुन आमदार संजय शिरसाठ यांनी सर्वांचीच दांडी उडवली. यावेळी भयान शांतता पसरली. तत्पुर्वी शहरात दंगल झाली तेव्हा एक टाका पडल्यानंतर काही अंतर पुढे गेले की, सहा टाके झाले, आणखी पुढे गेले की, दहा झाले मग आणखी पुढे गेले की, माणूसच मेला... अशा अफवा पसरल्या होत्या. पण आम्हाला माणूस जिवंत आहे हे दाखवावे लागले, असा किस्सा सांगत अफवांमुळे किरकोळ घटना पसरत जाते, अशी बाब रशीदमामूंनी अधोरेखित केली. 

खड्ड्यांवर कोण काय म्हणाले..

खड्डा पाहून तुमची आठवण येते 
माजी महापौर रशीद मामू : बारुदगर नाल्यालगत रस्ता व खड्डे पाहून मला तुमच्या तिघांची खूप आठवण होते. अर्थातच खासदार खैरे, आमदार जलील व जैस्वाल यांना हा टोला मारुन माजी महापौर रशीदमामू यांनी खड्ड्यांचा होणाऱ्या त्रासाबद्दल लोकप्रतिनिधींवर उपरोधिक टीका केली.

आम्ही चांगले तसे ‘हे’ पण आहोत 
राजू शिंदे : शहरात चार महिने येऊन झाले. शहर व येथील लोक खूप छान आहेत. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या अशा वक्तव्यावर राजू शिंदे यांनी टिप्पणी केली. ‘आम्ही जेवढे चांगले तेवढेच ‘हे’ आहोत’ असे सांगून त्यांनी शेवटचे चार दिवस रात्री बारापर्यंत मुभा द्यावी, अशी मागणी केली. ऐनवेळी पॅचवर्कची कामे दिसतात. जाऊ द्या, सगळ्यांसमोर नको बोलायला, असे म्हणत त्यांनी आता सुरु करा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

तुम्हाला शहरात राहायचे ना... 
आमदार संजय शिरसाठ : गणरायांच्या कृपेने पाऊस पडला, अशा भावना आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी भाषणात व्यक्त केल्या. यावर आमदार संजय शिरसाठ यांनी मुगळीकर देवत्व मानतात ही बाब आज समजली. त्यांनी दहा दिवस गणपती मंदिरांना हात लावू नये. निवृत्तीनंतर शहरातच राहायचे ना... कशाला खैरेंशी दुश्‍मनी घेता, असा टोला त्यांनी लगावला. तर शहरात आजही खड्डे आहेत, याची खंत वाटत असल्याचे ते म्हणाले.

शंभर कोटी दुसरीकडे वळवू नका 
आमदार इम्तियाज जलील : शंभर कोटी मिळाले. आता हा निधी रस्त्यांसाठीच वापरावा. इतरत्र हे पैसे वळवता कामा नये. रस्ते चांगले असावेत ही नागरिकांची इच्छा आहे. पण ठेकेदार रस्ते कसे बनवतात हे माहीतच आहे. जेथे रस्त्याचे काम सुरु होईल तेथे नागरिकांची समिती बनायला हवी, अशी अपेक्षा आमदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली.

रस्त्याचा निधी ओढला 
खासदार खैरे : शंभर कोटींच्या निधीतून आपल्याच मतदारसंघात जास्त कामे कशी होतील यावर अतुलभाऊंचे लक्ष आहे. मतदारसंघातील कामासाठीच त्यांनी जास्त निधी ओढला. पण असो... पर्यटनस्थळी जाणाऱ्या रस्त्यांचीही त्यांनी दखल घ्यायला हवी होती. ती शहराची ओळख आहे, असे सूचक वक्तव्य खासदार चंद्रकांत खैरे केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com