पेट्रोल दरवाढीविरुद्ध ‘राष्ट्रवादी’चा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईलचे दर घसरले असतानाही पेट्रोल, डिझेलच्या किमतींत दररोज पैशा-पैशाने वाढ सुरूच आहे. याविरोधात शनिवारी (ता. १६) दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी सरकारचा निषेध करीत दरवाढीच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. 

शहागंज येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा काढण्यात आला. या वेळी आंदोलनकर्त्यांनी ‘भाजपा सरकार होश मे आओ, जनता से तुम ना टकराओ’ अशा घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी शहराध्यक्ष मेहराज पटेल यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाषणे केली. महिला आघाडीतर्फे राज्यभर आंदोलने करण्यात आली. 

जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, की राज्यात दुष्काळ जाहीर न करता पेट्रोल, डिझेलवर दुष्काळ कर कशासाठी घेतला जातोय. या माध्यमातून सामान्याचा खिसा कापण्याचे काम केले जात आहे. सरकारने जनतेच्या प्रश्‍नांकडे वेळीच लक्ष द्यावे, अन्यथा राज्यभर आंदोलने केली जातील, असा इशारा या वेळी देण्यात आला आहे. या आंदोलनात जिल्हा कार्याध्यक्षा डॉ. अनुपमा पाथ्रीकर, छाया जंगले, मंजूषा पवार, शमा परवीन, शकीला खान, सलमा बेगम, अनीसा बाजी, सुभद्रा जाधव, अंकिता विधाते, शोभा गायकवाड, सरताज खान, जरीना बेगम यांच्यासह युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

देशातच दरवाढ का?
श्रीलंकेत पेट्रोल ४७ रुपये, नेपाळमध्ये ५९ रुपये लिटर आहे. या दोन्ही देशांत आपल्या देशातून पेट्रोलचा पुरवठा केला जातो. मग भारतात पेट्रोल, डिझेलचे दर एवढे का, असा सवाल या वेळी उपस्थित करण्यात आला.