पोलिस विभाग होतोय संवेदनशील

पोलिस विभाग होतोय संवेदनशील

औरंगाबाद - महाराष्ट्र पोलिसांनी, पोलिसांची मानसिकता बदलविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पारंपरिक दबावतंत्र वापरून परिस्थिती हाताळण्यापेक्षा ‘इमोशनल इंटेलिजन्स’ची (भावनिक प्रज्ञा) जोड दिल्यानंतर आमूलाग्र बदल होतात. हे स्पष्ट झाल्याने गृह विभागाने पोलिसांना ‘इमोशन इंटेलिजन्स हे विशेष प्रशिक्षण’ देण्यास सुरवात केली आहे. वर्षभरात साडेसहा हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना हे प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून सकारात्मक परिणाम दिसत आहेत.

पोलिसवर्ग प्रचंड ताणतणावात असतो. त्यामुळे त्यांची मानसिकता बिघडते. त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या कामावर, शारीरिक स्वास्थ्यावर; तसेच कुटुंबावर आणि समाजावरही होतो. त्यामुळे पोलिसांची प्रतिमाही मलिन होते. म्हणूनच पोलिसांच्या मनाशी संवाद साधणाऱ्या ‘प्रशिक्षण कार्यक्रमाची’ आखणी करण्यात आली आहे. 

पोलिसांच्या कामातून आणि ताणतणावातून उद्‌भवणाऱ्या परिस्थितीवर कसे नियंत्रण मिळवावे, याचा विचार करून जून २०१६ मध्ये तत्कालीन अपर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण) व्यंकटेशन यांनी ‘पार एक्‍सलंट लीडरशिप सोल्युशन या एजन्सी’च्या मदतीने प्रशिक्षण कार्यक्रम आखला. याला आता विद्यमान अपर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण) एस. जगन्नाथन यांनीही प्रोत्साहन दिले आहे. सुरवातीलाच ट्रेनर तयार करण्यासाठी नाशिकच्या ‘महाराष्ट्र पोलिस ॲकॅडमीत’ पोलिस निरीक्षक ते पोलिस अधीक्षक दर्जाच्या ५२ अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. 

प्रशिक्षित झालेल्या, पोलिस अधिकाऱ्यांनी राज्यातील दहा पोलिस प्रशिक्षण केंद्रांमध्ये सहा हजार पोलिस आणि तीनशे पोलिस अधिकाऱ्यांना हे प्रशिक्षण दिल्याची माहिती मरोळ पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य सोमनाथ घार्गे यांनी दिली. श्री. घार्गे यांच्यासह प्रशिक्षित झालेले पन्नास अधिकारी राज्यभर प्रत्येक परिक्षेत्रनिहाय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देत आहेत. औरंगाबाद परिक्षेत्रातील तीस अधिकाऱ्यांसाठी ऑगस्ट महिन्यात हे प्रशिक्षण घेण्यात आले. महाराष्ट्राचा हा प्रशिक्षण कार्यक्रम संपूर्ण देशभर राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून भोपाळ (मध्यप्रदेश) येथील सेंट्रल ॲकॅडमी फॉर पोलिस ट्रेनिंग सेंटर येथे मध्यप्रदेशातील पोलिस अधिकाऱ्यांसाठी दोन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आलेत.

पोलिसींग शिवाय लोकांच्या भावना समजून घेणे पोलिसांना अधिक आवश्‍यक आहे, म्हणून वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला हा प्रशिक्षण कार्यक्रम पोलिसांसाठी सुरु केला. यातून चांगले परिणाम समोर येत असून देशपातळीवर महाराष्ट्र पोलिसांचा हा उपक्रम रोल मॉडेल ठरला आहे. या प्रशिक्षणाची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. 
- एस. जगन्नाथन, अप्पर पोलिस महासंचालक, प्रशिक्षण

समाजात नेहमीच उद्‌भवणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या किंवा अन्य कुठल्याही प्रसंगांना पोलिसांना सहज तोंड देता यावे, परिस्थिती खेळीमेळीच्या वातावरणात हाताळता यावी, हा प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. 
- सोमनाथ घार्गे, प्राचार्य पोलिस प्रशिक्षण केंद्र, मरोळ, मुंबई

काय आहे प्रशिक्षण?
इमोशनल इंटेलिजन्स (भावनिक प्रज्ञा) म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता विकसित करणे हा प्रशिक्षणाचा प्रमुख भाग आहे. तीन दिवस सलग प्रशिक्षणात पोलिसांना आपल्या भावनांचा वापर करणे, भावना समजून घेणे, भावनांचे व्यवस्थापन करणे, स्वत:ची जागरुकता वाढविणे, सामाजिक कौशल्य हस्तगत करणे अशा वेगवेगळ्या पैलूंवर थेट मनाशी मनाचे नाते जोडून व्यक्तिमत्त्वात बदल घडवून आणण्याचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षित प्रत्येक अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे. मात्र, प्रशिक्षण देण्याचे कौशल्य प्रत्येकाकडे असेलच असे नाही, म्हणून किमान हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि पोलिस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधताना त्याचा उपयोग होऊन पोलिसांची प्रतिमा सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com