साडेचार हजारांची लाच घेताना सहायक फौजदार जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - अवैध दारू विक्रीच्या गुन्ह्यात जप्त केलेली दुचाकी सोडण्यासाठी पाच हजारांची मागणी करून साडेचार हजार रुपये लाच घेणाऱ्या वडोदबाजार ठाण्याच्या सहायक फौजदाराला (एएसआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. मंगळवारी (ता. दहा) साडेचार वाजता आळंद येथील चहाच्या टपरीजवळ ही कारवाई करण्यात आली.

ज्ञानेश्‍वर हरिभाऊ मेटे (५३) असे अटकेतील सहायक फौजदाराचे नाव आहे. याबाबत एसीबीचे उपअधीक्षक किशोर चौधरी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा शेतकरी आहे. त्याच्याविरुद्ध २० ऑगस्टला मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात वडोदबाजार पोलिसांनी दुचाकी जप्त केली होती. ही दुचाकी सोडण्यासाठी तपास अधिकारी असलेल्या सहायक फौजदार ज्ञानेश्‍वर मेटे याला न्यायालयात म्हणणे सादर करावे लागते. त्यानंतर दुचाकी सोडवून घेता येते. त्यासाठी मेटे याने तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली; परंतु तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार मंगळवारी लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार, सापळा रचण्यात आला. आळंद येथील इमाम मेडिकल स्टोअर्सच्या बाजूला चहाच्या टपरीजवळ पाच हजार रुपयांची मागणी करून साडेचार हजार रुपये लाच घेताना मेटेला पकडण्यात आले. पोलिस निरीक्षक सचिन गवळी, प्रमोद पाटील, सहायक फौजदार दिलीपसिंग राजपूत, रवी देशमुख, गोपाल बरंडवाल, संतोष जोशी, दिगंबर पाठक यांनी ही कारवाई केली.